भांडण मिटविल्याने दोघा भावांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:30 AM2018-10-28T00:30:46+5:302018-10-28T00:31:48+5:30
भांडण मिटवल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी दोघांवर लोखंडी कोयत्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
लोणी काळभोर : भांडण मिटवल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी दोघांवर लोखंडी कोयत्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. होळकरवाडी (ता. हवेली ) येथे ही घटना घडली आहे.
कुमार व गणेश झांबरे या दोन भावांना मारहाण करण्यात आली आहे. बुधवार (दि. २४ ) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हंडेवाडी येथील स्टीलच्या गोडावून समोर झांबरे यांचे मित्र एकनाथ सुर्वे (रा. औताडेवाडी ) व शंभूराजे भोसले या दोघांचे गाडी घासल्याचे कारणांवरून किरकोळ भांडण झाले. ते गणेश झांबरे यांने मिटवले व तो घरी आला. काही वेळाने भोसले आपल्या मित्राला बरोबर घेऊन तेथे आला व गणेश याला आमचे भांडण सोडवण्यासाठी का आलास ? असे म्हणून ते दोघे तेथून निघून गेले.
शुक्रवारी (दि. २६ ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुमार व गणेश झांबरे हे दोघे भाऊ आपला मित्र सागर हिंगे याचेसमवेत होळकरवाडी जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर थांबले होते. यावेळी पाच दुचाकी वरून वरील नऊ जण आले. शंभूराजे भोसले याने गणेश यास शिवीगाळ केली व तु काय भाई लागून गेलास काय ? असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून हिंगे घाबरून बाजूला निघून गेला. यानंतर कुमार याने शंभूराजे यास भावाला मारहाण करू नकोस. काय असेल ते नंतर पाहू असे म्हणाला.
याचा राग शंभूराजे यास आला व तो हातात लोखंडी कोयता घेऊन त्याचेवर धाऊन गेला. त्याने डोक्यावर मारण्यासाठी कोयता उगारला. कुमार याने प्रसंगावधान राखून आपला उजवा हात आडवा केला. त्यामुळे वार हाताच्या तळव्यावर बसला. याचवेळी तुला जिवे ठार मारून टाकतो असे म्हणून डोक्यावर वार केला. सनी शेवाळे याने लाकडी दांडक्याने तर चिराग शेवाळे याने लोखंडी गजाने कुमार व गणेश या भावांना हात व पाठीवर मारहाण केल्याने ते दोघे खाली कोसळले. त्यानंतर बालाजी पवार, निखिल लोहार, महेश पवार, युवराज लसकर, मयूर जंगमवाड यांनी हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
कुमार मारूती झांबरे ( वय २५, रा. होळकर वाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंभूराजे भोसले ( रा. मयूर पार्क, हंडेवाडी ता. हवेली ), सनी मोहन शेवाळे, चिराग शेवाळे व बालाजी पवार ( तिघे रा. शेवाळवाडी, ता. हवेली ), सागर औताडे ( रा. औताडवाडी ), निखिल लोहार, महेश पवार, युवराज लसकर व मयूर जंगमवाड ( चौघेही रा. हंडेवाडी, ता. हवेली ) या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
४डोके, हातावर वार करून, लाकडी दांडके व लोखंडी गज पाठीवर मारून, शिवीगाळ, दमदाटी करून हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.