डीएसके विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:34 PM2017-11-15T22:34:45+5:302017-11-15T22:35:26+5:30
गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत
पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. अशा सुमारे २०० ते २५० लोकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती़
धायरीतील डीएसके विश्वमध्ये आनंदघन फेज ६ मध्ये २०१३ मध्ये डीएसके यांनी बांधकाम सुरू केले होते़ या योजनेत सुमारे ४५० फ्लॅट असून, २०१३ पासून ही स्किम सुरू करण्यात आली़ या ठिकाणी त्यापैकी अनेकांना डिसेंबर २०१६ मध्ये ताबा मिळणार होता़ एकीकडे फ्लॅटचा ताबा नाही, दुसरीकडे फायनान्स कंपनीचे हप्ते सुरू झाल्याने त्रस्त झालेल्या फ्लॅटधारकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती़ या ठिकाणी फ्लॅट घेतलेल्या धारकांनी सांगितले की, डीएसके यांनी आधी ताबा, नंतर हप्ते, अशी योजना आखली होती़ त्यात ताबा मिळेपर्यंत आम्ही हप्ता भरू, असे डीएसके यांनी सांगितले होते़ त्याप्रमाणे त्यांनी काही हप्ते भरलेही़ परंतु, फेब्रुवारीपासून हप्ते भरणे बंद केले़ त्यामुळे फायनान्स कंपनीने आमच्या खात्यातून हप्त्याची रक्कम कापून घेण्यास सुरुवात केली आहे़ दुसरीकडे आमच्या स्किममधील इमारतीचे काम वर्षभरापासून बंद पडले आहे़ ते कधी पूर्ण होईल याची काहीही शाश्वती नाही़ १५ नोव्हेंबरपासून काम सुरु करतो, असे आश्वासन डीएसके यांनी दिले होते़ त्याप्रमाणे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे सुमारे ४०० फ्लॅटधारक बुधवारी साइटवर जमलो़ पण, तेथे केवळ गवत काढण्याचे काम सुरू होते़ बांधकाम सुरू झाले नव्हते म्हणून आम्ही कंपनीच्या कार्यालयात गेलो. पण, तेथे कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेवटी पोलीस ठाण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़.
एका बाजूला राहायला हक्काची जागा नाही, त्यात फायनान्स कंपनीकडून हप्ते कापून घेण्यास सुरुवात झाल्याने आम्ही आर्थिक अडचणीत येऊ लागलो आहोत़ किमान घरांचा ताबा देईपर्यंत तरी हप्ते कापून घेऊ नका, असे फायनान्स कंपनीला सांगावे, अशी आम्ही विनंती केली़ डीएसके जबाबदारी झटकत नाही़ पण, प्रत्यक्षात काहीच करत नाही, अशी तक्रारही काही जणांनी यावेळी केली़
या सर्वांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची भेट घेऊन आपली तक्रार सांगितली़ त्यांना शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत बोलविण्यात आले आहे़
याबाबत प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, डीएसके प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेत स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे़ तेथील पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे मुंबईला असल्याने या सर्वांना शनिवारी त्यांची भेट घेऊन तक्रार देण्यास सांगितले आहे़
गुंतवणूकदारांना त्यांच्या मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतरही त्या परत न मिळाल्याने हजारो गुंतवणूकदारांनी आतापर्यंत शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत दिलासा दिला आहे़
डीएसके यांच्याविरोधात पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे आत्तापर्यंत एकूण २६९२ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून, त्यातील रक्कम १७० कोटींहून अधिक आहे. याशिवाय मुंबई आणि कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल झाले आहेत.