डॉक्टरांच्या संपामुळे ससूनमधील रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:54 AM2018-06-14T03:54:29+5:302018-06-14T03:54:29+5:30
विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पुणे - विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होत आहेत. परंतु, रुग्णांच्या जीविताला धोका पोहोचू नये; याची काळजी घेत असल्याचा दावा आंदोलक डॉक्टरांनी केला आहे. दरम्यान, इंटर्न डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आयोजित करून अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध व्यक्त केला.
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना प्रत्येक विद्यार्थ्याला सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. मात्र, वाढत्या महागाईच्या तुलनेत दिले जाणारे विद्यावेतन कमी आहे. त्यामुळे संघटनेने विद्यावेतनाच्या रकमेत वाढ करावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला, असे बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील डॉ. केतन देशमुख यांनी सांगितले.
काम बंद आंदोलनातून तातडीच्या सेवा वगळता इतर सर्व ठिकाणांवरील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले होते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड, कॅथलॅब, रक्तपेढी येथील कामकाजांवर परिणाम झाला. प्रामुख्याने रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेणे, रुग्णाच्या आजारांच्या नोंदी घेणे ही कामे प्रशिक्षणार्थी डॉक्टर करतात. मात्र, काम बंद आंदोलनामुळे ही कामे निवासी डॉक्टरांना करावी लागत आहेत. परिणामी रुग्णसेवेच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. दरम्यान, शासनाकडून लेखी आश्वासन प्राप्त झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.
डॉ. केतन देशमुख म्हणाले, की राज्य शासनाने २०१२मध्ये विद्यावेतनामध्ये वाढ केली. त्या वेळी वाढत्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ११ हजार वेतन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासंदर्भात पाठपुरावा करूनही त्यात वाढ करण्यात आली नाही. मानधनवाढीबरोबरच वसतिगृहाबाबत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत. विद्यावेतनामध्ये १५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले होते. परंतु, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती असोसिएशनचे मुंबईतील जनरल सेक्रेटरी डॉ. गोकूळ राख यांनी दिली.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच पॅरामेडिकल आणि निवासी डॉक्टरांनी सर्व बाजू सांभाळून घेतली आहे.