नाल्यात बुडून चिमुरड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 03:49 AM2016-02-28T03:49:01+5:302016-02-28T03:49:01+5:30
सोमवार पेठेतील नागझरीमध्ये पडल्यामुळे तीन वर्षीय चिमुकल्याचा शुक्रवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट असल्यामुळे डॉक्टरांनीही व्हिसेरा
पुणे : सोमवार पेठेतील नागझरीमध्ये पडल्यामुळे तीन वर्षीय चिमुकल्याचा शुक्रवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट असल्यामुळे डॉक्टरांनीही व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळे घटनास्थळ आणि वेळ पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला असून, पोलीस तपासाची मागणी केली आहे.
शाहीद खुर्शिद अहमद शेख (वय ३ वर्ष ३ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे. फरासखाना पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शाहीदचे मामा शेख जिलानी अब्दुल मजीद (सोमवार पेठ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीदचे वडील सौदी अरेबियाला असतात. त्याठिकाणी ते सलूनमध्ये काम करतात. तर शाहीदची आई दोन मुली आणि मुलासह मागील सात वर्षांपासून त्यांच्याकडेच राहण्यास आहे. शाहीद नरपतगिरी चौकातील एका नर्सरीमध्ये जात होता.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शाहीद, त्याच्या दोन बहिणी आणि आई नमाज पढत होत्या. नमाज पढत असताना शाहीद खेळत होता. खेळत खेळत तो घराबाहेर गेला. नमाज संपल्यानंतर त्याची आई घाईने त्याच्यामागे धावली. मात्र, तो दिसला नाही. त्यांनी सोसायटीच्या जवळच्या परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याचे मामा शेख जिलानी हेसुद्धा नमाजला गेलेले होते. त्यांना मोबाईलवर माहिती सांगितल्यानंतर ते धावत आले. त्यांनी तातडीने जवळच्या भागात त्याचा शोध घेतला. मात्र, शाहीद आढळून आला नाही.
दरम्यान, नाल्यामध्ये असलेल्या बागेमध्ये शाहीदचा शोध घेण्यासाठी त्याची मामी गेली होती. मीनाताई ठाकरे नाला उद्यानामध्ये घरापासून काही अंतरावरच शाहीद पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर आसपासचे लोक धावत आले. शेख जिलानी यांना फोन करून घरच्यांनी माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धावात शाहीदला पाण्याबाहेर काढले. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. विशेष म्हणजे शाहीदच्या शरीरावर कोठेही साधी खरचटल्याचीही खूण नाही. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असून, यामागे घातपाताची शक्यता शेख जिलानी यांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या उदासीनतेमुळे मृत्यू/५
...त्यांना अश्रू अनावर झाले!
‘शाहीदचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मीच त्याला लेबर रुममधून हातामध्ये बाहेर आणले होते. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आणि दुर्दैवाने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेहही मलाच माझ्या हातांनी उचलून रुग्णालयात न्यावा लागला.’ हे सांगताना शेख जिलानी यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदका आवरत अशी घटना कोणाच्याही आयुष्यात कधी घडू नये, अशी ‘दुवा’ मागत होते. बहिणीची अवस्था फारच वाईट झाली असून, तिला मानसिक धक्का बसल्याचे शेख जिलानी यांनी सांगितले.
फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली, तरी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी शेख जिलानी यांनी केली आहे. घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी कोणकोण येऊन गेले, याची माहिती घेऊन चौकशी करावी.
पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मात्र, कोणीही वरिष्ठ पोलीस अधिकारी अद्याप घटनास्थळाला भेट द्यायला आलेला नाही. पोलिसांनीही या प्रकरणात गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
ज्या महिला पोलीस उपनिरीक्षकाकडे हा तपास देण्यात आला आहे त्यांनाच घटनेची कल्पना नव्हती. सुटीवरुन परतलेल्या या महिला उपनिरीक्षक थेट लाल महालावरच्या बंदोबस्तावर गेल्यामुळे त्यांना गुन्ह्याची माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले.