सुट्यांमुळे मोरगावला भाविकांची गर्दी
By Admin | Published: May 12, 2017 04:51 AM2017-05-12T04:51:01+5:302017-05-12T04:51:01+5:30
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे उन्हाळी सुटी व लग्नतिथी यांमुळे भाविकांची गर्दी होत आहे. दिवसाकाठी हजारो भाविक मयूरेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे उन्हाळी सुटी व लग्नतिथी यांमुळे भाविकांची गर्दी होत आहे. दिवसाकाठी हजारो भाविक मयूरेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत.
जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची पाच स्थाने असून, मोरगावच्या मयूरेश्वरापासून यात्रेची सुरुवात केली जाते. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू असल्याने राज्यभरातील भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत आहेत. केतकावळे येथील प्रतिबालाजी, नारायणपूरचा एकमुखी दत्त, जेजुरीचा खंडोबा, मोरगावचा गणपती, करंजे येथील सोमेश्वर आदींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताना दिसत आहेत.
उन्हाळी सुट्या तसेच लग्नतिथीमुळे मोरगाव येथे भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे. रोज हजारो भाविक पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी येत आहेत. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टने पिण्याचे पाणी, सुरक्षारक्षक स्वच्छता कामगार तसेच दुपारी १२ ते २ पर्यंत अन्नसत्राचे आयोजन केले आहे. सध्या मोरगाव परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असली तरी देवस्थान ट्र्स्ट व ग्रामपंचायत मोरगाव यांच्या वतीने भाविकांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली आहे.