निवडणुक कामांमुळे २० दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 09:05 PM2019-03-26T21:05:31+5:302019-03-26T21:06:14+5:30
लोकसभा निवडणूक कामांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने मंगळवारी दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प पडले.
पुणे : लोकसभा निवडणूक कामांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने मंगळवारी दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प पडले. शहरातील २८ पैकी तब्बल २० कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणी करता आली नाही.
राज्यात दररोज अकरा ते बारा हजार दस्त नोंदणी होते. त्यात मुंबई, ठाणे आणि पुण्याचा वाटा अधिक असतो. पौड रस्ता आणि लष्कर भागातील दोन कार्यालये सकाळी सातला सुरु होतात. त्यांना देखील दुपारी निवडणुक कामकाजाबाबत माहिती मिळाल्याने, सुमारे तासाभराचे कामकाज होऊ शकले नाही. तर, वीस कार्यालये बंद होती. कार्यालयाचे कामकाज बंद झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.
राज्याच्या कर आकारणी आणि महसुल वसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी विक्रीकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, अकृषी कर वसुलीसाठी निर्माण करण्यात आलेल्या पथकांना निवडणूक कामकाज देऊ नये असा आदेश राज्य सरकारने १९९७ रोजी काढला होता. अर्थात हा निर्णय त्यावेळच्या स्थानिक निवडणूकांसाठी लागू होता. मुद्रांक शुल्क विभाग राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर महसुल मिळवून देतो. यंदाच्या आर्थिक वर्षांत २२ हजार २२० कोटींचा महसुल जमा झाला आहे.
ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते श्रीकांत जोशी म्हणाले, मुद्रांक विभाग हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने या पुर्वी निवडणुक कामकाजातून वगळलेल्या विभागात हा विभाग देखील येतो. या विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देऊ नये.
मुद्रांक कार्यालये नागरिकांशी संबंधित आहेत. कोणतीही सूचना न देता कार्यालये अचानकपणे बंद केली गेली. त्यामुळे बाहेरून आलेले पक्षकार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे अतोनात हाल झाले. ज्या कार्यालयाकडून महसूल जमा होतो, अशी कार्यालये बंद ठेवता येत नाहीत. नागरिकांना त्रासाला सामोरे जाऊ नये यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूकीचे काम देऊ नये, असे असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.