एक्स्प्रेस वेवर आॅईल सांडल्याने वाहतूककोंडी
By Admin | Published: May 21, 2017 04:02 AM2017-05-21T04:02:44+5:302017-05-21T04:02:44+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरमधून आॅईल सांडल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सव्वानऊच्या सुमारास खंडाळा घाटातील
- लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरमधून आॅईल सांडल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सव्वानऊच्या सुमारास खंडाळा घाटातील अमृतांजन पूल परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका टँकरमधून खंडाळा बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पूल दरम्यान मोठ्या प्रमाणात आॅईल रस्त्यावर सांडले, ज्या भागात हे आॅईल सांडले तेथे तीव्र स्वरूपाची चढण आहे. घाट परिसरात आॅईलवरून वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. यामुळे मार्गावर ४ ते ५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नागरिकांचे हाल
घटनेची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेले आयआरबीचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील आॅईल हटविण्याचे काम, तसेच आॅईलवर माती व भुस्सा टाकण्याचे काम युद्धपातळीवर करीत साडेदहाच्या सुमारास वाहतूक पूर्ववत केली. आज शनिवार असल्याने सकाळपासूनच एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक संथ असताना ही वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांचे हाल झाले.