खोल खड्ड्यात पडलेले हरिण जवानांमुळे सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 03:55 PM2018-06-11T15:55:33+5:302018-06-11T15:55:33+5:30
वारजे येथील डुक्कर खिंड लगतच्या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यात पडलेल्या हरणाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले आहे.
पुणे : वारजे येथील डुक्कर खिंड लगतच्या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यात पडलेल्या हरणाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले आहे.
रविवार रात्री आठ वाजता एक हरिण वारजेतील डुक्करखिंड रस्त्यालगत असणा-या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यामधे किमान वीस ते पंचवीस फुट खाली पडले होते. खड्डयामधे ब-याच प्रमाणात मोठी दगडे, पालापाचोळा, गवत व पाणी असल्याने त्या हरिणास बाहेर पडणे जमत नसल्याचे स्थानिकांनी पाहिले व त्यांनी प्राणी मित्र प्रतिक महामूनी यांना मोबाईलवरुन ही माहिती कळविले. महामूनी व वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले.
सिहंगड अग्निशमन केंद्राचे जवान ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. जवानांनी पाहिले की, हरिण जिवंत स्थितीमध्ये असून खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत तिथेच त्याची तेवढ्याच भागात धावाधाव सुरु आहे. त्याची सुटकेची बेचैनी पाहात जवानांनी दोरी व जाळीच्या सहा्याने त्याला वर घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, हरिण भेदरलेल्या स्थितीत असल्याने त्याला जाळीमध्ये घेणे अवघड जात होते. पण शेवटी सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमध्ये घेण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. बाहेर काढल्यानंतर त्याला काही प्रमाणात किरकोळ जखमा झाल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी जवानांनी कात्रज प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधून अग्निशमन वाहनातून हरणाला तिथे प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात दिले.
या साहसी कामगिरीमध्ये चालक भरत भुजबळ तसेच तांडेल रोहिदास दुधाणे व जवान संतोष भिलारे, सुनिल दिवाडकर, भरत गोगावले, भारत पवार यांनी सहभाग घेतला.