धायरीत प्लायवूडच्या कारखान्याला भीषण आग, कारखाना जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:26 AM2019-05-01T09:26:05+5:302019-05-01T09:26:13+5:30
धायरी स्मशानभूमीजवळ असणा-या प्लायवूडचे दरवाजे बनविणा-या कारखान्याला पहाटे भीषण आग लागून त्यात सर्व लाकडी साहित्य, मशिनरी जळून कोळसा झाले.
पुणे : धायरी स्मशानभूमीजवळ असणा-या प्लायवूडचे दरवाजे बनविणा-या कारखान्याला पहाटे भीषण आग लागून त्यात सर्व लाकडी साहित्य, मशिनरी जळून कोळसा झाले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी मिळाली. धायरी येथील मनोहर मंगल गार्डन शेजारी व्हिजन डोअर हा प्लायवूडचे दरवाजे बनविणारा कारखाना आहे. कारखान्याच्या सुरुवातीला त्यांचे लाकडी सामानाच्या पट्ट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशिनरी व इतर साहित्य होते. त्याच्या मागे त्यांचे कामगार राहात होते.
पहाटे एक कामगार उठला. तेव्हा त्याला आग लागल्याचे समजले. कात्रज अग्निशामन केंद्राचे प्रभाकर उमराटकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण आग ही खूप अगोदर लागली होती. त्यात लाकडी साहित्य असल्याने त्याने पटकन पेट घेतला होता. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व एका टँकरने ही आग अर्धा तासात आटोक्यात आणली.
याबाबत प्रभाकर उमराटकर यांनी सांगितले की, ही आग नेमकी कारखान्याच्या आतल्या बाजूला लागली की बाहेरुन आत गेली हे समजू शकले नाही. कारखान्याच्या बाहेर लाकडे कापल्यानंतरचा भुसा मोठ्या प्रमाणावर पडला होता. तोही जळून गेला होता. या कारखान्यातील सीसीटीव्ही जळून गेले असले तरी त्याचा बॉक्स कार्यालयात असल्याने तो वाचला आहे. त्यावरुन आग नेमकी कशी लागली हे समजू शकणार आहे.