आगडोंब विझेना, प्रवासी असुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:19 PM2018-09-11T14:19:14+5:302018-09-11T14:25:18+5:30
दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे.
पुणे : अचानक आग लागून बस पेटण्याच्या घटना थांबविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत पाच बस पेटल्या आहेत. बसेसचे फायर आॅडीट करण्याचा निर्णयही गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान आहे.
मागील काही वर्षांत पीएमपीच्या मार्गावर धावणाऱ्या काही बसेसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. साधारणपणे दीड महिन्यातून एक बस जळून खाक होत आहे. दि. १ जानेवारी ते दि. १० सप्टेंबर या कालावधीत पीएमपीच्या मालकीच्या दोन व खासगी ठेकेदारांकडील तीन बसेसला आग लागली आहे. काही बसेसने प्रवासी असतानाच पेट घेतला होता. तर काही बसेस पार्किंगमध्ये उभ्या असताना पेटल्या. पाचही अपघातांमध्ये प्रवाशांना कसलीही हानी झाली नाही. मात्र, या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारी (दि. १०) पेटलेली बस पार्किंगमध्ये उभी होती. मार्गावर येण्यापुर्वीच शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. रात्रभर पार्किंगमध्ये असलेली बस मार्गावर येण्यापुर्वी काही वेळ आधी पेट घेते, याचा अर्थ या बसच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसते. ही बस खासगी ठेकेदाराकडील होती. प्रशासनाने यापुर्वीही ठेकेदारांच्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर ताशेरे ओढले आहेत. पण त्यानंतरही ब्रेकडाऊन किंवा बसला आग लागण्याचे प्रकार सुरूच आहे. ठेकेदारांप्रमाणेच पीएमपीच्या मालकीच्या बसही अधुनमधून पेट घेतात. ब्रेकडाऊनचे प्रमाणही लक्षणीय आहे. शेकडो बस १० वर्षांपुढील असल्याने या बसेसच्या क्षमतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. पण सध्यातरी पीएमपीकडे या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुनाट, खिळखिळया झालेल्या बस मार्गावर आणणे गरजेचे आहे. पण हे करत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. यासाठी केवळ पीएमपी प्रशासन जबाबदार नसून दोन्ही महापालिकांमधील तत्कालीन व सध्याचे सत्ताधारीही कारणीभुत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवासी संघटना करतात.
---------------