उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी सुटेल
By admin | Published: October 16, 2016 04:14 AM2016-10-16T04:14:14+5:302016-10-16T04:14:14+5:30
पुण्यातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेता इथे सातत्याने वाहतूककोंडी होत असते. त्यातून सुटण्यासाठी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. सीओईपी उड्डाणपुलामुळे
पुणे : पुण्यातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेता इथे सातत्याने वाहतूककोंडी होत असते. त्यातून सुटण्यासाठी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. सीओईपी उड्डाणपुलामुळे किमान या रस्त्यावरची वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली.
अभियांत्रिकी महाविद्यालय ते पाटील इस्टेट या दरम्यान पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद््घाटन शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार येणार होते, मात्र ते आले नाहीत. जगताप म्हणाले, ‘‘नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. हा उड्डाणपूल त्याचाच एक भाग आहे. पुण्यातून मुंबईला जाणारी वाहने व विश्रांतवाडीवरून शहरात येणारी वाहने यांना या पुलाची मदत होईल व शहरातील रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताण त्यातून कमी होईल.’’ (प्रतिनिधी)