कबूतरांना नागरिकांकडून खाद्याची खैरात; श्वसनाच्या अाजारांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 07:18 PM2018-09-20T19:18:20+5:302018-09-20T19:20:22+5:30
कबूतरांच्या विष्ठेतून अनेक श्वसनाच्या अाजरांना निमंत्रण मिळत असतानाही शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांकडून कबूतरांना खाद्य टाकण्यात येत अाहे.
पुणे : कबूतरांच्या विष्ठेतून अनेक श्वसनाच्या अाजरांना निमंत्रण मिळत असतानाही शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांकडून कबूतरांना खाद्य टाकण्यात येत अाहे. कबूतरांच्या विष्ठेतून अनेक अाजार हाेत असल्याने कबूतरांना खाद्य टाकून नागरिक स्वतःच साथीच्या अाजारांना निमंत्रण देत अाहेत.
कबूतरांच्या विष्ठेतून तसेच त्यांच्या पिसांमध्ये अनेक विषाणू असतात. त्यांच्या मानवाच्या श्वसनावर तसेच फुफुसांवर परिणाम हाेत असताे. या विषाणूंमुळे अस्थमा, फुफुसाचा संसर्ग, श्वसनाचे विकार हाेऊ शकतात. महापालिका प्रशासनाकडून कबूतरांना घराच्या जवळ धान्य टाकू नये याबाबत वेळाेवेळी अावाहन करण्यात येते. परंतु अनेकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून दरराेज शहरातील विविध ठिकाणी कबूतरांना माेठ्याप्रमाणावर धान्य टाकण्यात येते. रास्ता पेठ येथील अपाेलाे थिअटरचाैक, तसेच महावितरण कार्यालयाच्या समाेरील चाैकात हे प्रकार माेठ्याप्रमाणावर अाढळतात. वाऱ्यामुळे हे विषाणू हवेत पसरत असल्याने येथून जाणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार हाेण्याचा धाेका निर्माण झाला अाहे. कबूतरांचे थवेच्या थवे येथे जमा हाेत असल्याने माेठ्याप्रमाणावर विष्ठा तसेच त्यांची पिसे या परिसरात पसरलेली असतात. हे साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे विकार हाेण्याचा धाेका अधिक अाहे. तसेच घराच्या टेरेस, बालकणीत सुद्धा धान्य टाकण्यात येते. त्यामुळे लहान मुलांच्या फुफुसांवर कबूतरांच्या विष्ठेतील विषाणूंचा परिणाम हाेऊ शकताे.
याविषयी बाेलताना ससूनच्या श्वसनराेग शास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. संजय गायकवाड म्हणाले, कबूतरांच्या विष्ठेमध्ये विविध प्रकारचे विषाणू, बुरशी, बॅक्टेरिया असतात. हवेतून ते पसरत असतात. या हवेत नागरिक अाल्यास त्यांना फुफुसाचा संसर्ग, अस्थमा, श्वसनाचे विकार हाेऊ शकतात. त्याचबराेबर श्वासाेच्छवासाची क्षमता कमी हाेऊ शकते. खासकरुन स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे अाजार हाेण्याचा धाेका अधिक संभवताे. त्यामुळे कबूतरांना खाद्य टाकणे घातक ठरु शकते.