कचरा प्रश्नावरून महापालिकेत जोरदार गोंधळ
By admin | Published: April 20, 2017 07:04 AM2017-04-20T07:04:07+5:302017-04-20T07:04:07+5:30
‘पुणेकरांना कचऱ्याचा त्रास, भाजपाला खुर्चीचा ध्यास’, ‘कचरा प्रश्न पेटला असताना परदेशवारी करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो’, अशा जोरदार
पुणे: ‘पुणेकरांना कचऱ्याचा त्रास, भाजपाला खुर्चीचा ध्यास’, ‘कचरा प्रश्न पेटला असताना परदेशवारी करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी कचऱ्याच्या प्रश्नावर बुधवारी (दि.१९) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ घातला. कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संधी द्यावी, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सत्ताधारी भाजपा काही वेळ हतबल झाला व सभा तहकूब करण्याची तयारी केली. अखेर महापौर मुक्ता टिळक यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर खास सभा घेण्याची व विरोधकांना चर्चा करण्याची संधी दिली.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने गेल्या पाच दिवसांपासून शहरात कचऱ्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा डेपोतील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. यामुळे सध्या शहराच्या विविध भागांत कचरापेट्या भरून वाहत असून, नागरिकांच्या आरोग्याबाबतीत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेना, मनसेच्या सदस्यांनी फ्लेक्सबाजी करत सभागृहात कचरा आणला व सत्ताधारी भाजपाचा धिक्कार केला. महापौर मुक्ता टिळक सभागृहात आल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामध्ये काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे, वसंत मोरे, योगेश ससाणे, अविनाश बागवे, संजय भोसले यांनी शहरात कचरा प्रश्न पेटला असताना प्रशासन झोपा काढतेय का, असा सवाल उपस्थित केला. महापौरांनी प्रशासनाच्या वतीने घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांना कचरा प्रश्नावर खुलासा करण्यास सांगितले. यावर अगोदर सदस्यांना कचरा प्रश्नावर चर्चा करण्याची संधी द्या, नंतर अधिकाऱ्यांना खुलासा करण्यास सांगा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत कचऱ्याची सद्यस्थिती समजण्यासाठी अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश महापौरांनी दिले. यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले कचराप्रश्नावर चर्चा टाळणाऱ्या महापौरांचा धिक्कार, अशा घोषणा देऊन सभागृह डोक्यावर घेतले.