धरणसाखळीत पावसाचा जोर कायम; जिल्ह्यातील धरणात ७१.२८ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:46 AM2018-07-27T02:46:14+5:302018-07-27T02:46:36+5:30
रखडलेल्या पेरण्यांना वेग; खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढला
घोडेगाव : जिल्ह्यातील १६ प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्व धरणांत आतापर्यंत ७१.२८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७४.५० टक्के पाणीसाठा झाला होता. यावर्षी जिल्ह्याच्या पूर्व भागात म्हणावा असा पाऊस पडला नसला, तरी उत्तर भागात असलेल्या आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पडलेल्या पावसाने धरणे भरत आली आहेत.
पुणे जिल्ह्यात पावसाने सुरूवातीला चांगली हजेरी लावली होती. यानंतर पावसाने दडी मारली होती. लावण्या सुरू झाल्यावर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने काही दिवस लागवडही रखडली होती. पूर्व भागात पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. पावसाच्या दडीमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. यानंतर जुलै महिन्यत पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. धरण परिसारात पावसाचा जोर कायम असून यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख १६ धरणांची यावर्षी व मागील वर्षीची आकडेवारी पाहिली असता खडकवासला यावर्षी १०० टक्के तर मागील वर्षी १९.४१ टक्के भरले होते. गुंजवणी धरण यावर्षी ५७.६४ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी धरणात ६७.५१ टक्के पाणी साठा होता. धरण परिसात पावसाचा जोर कायम आहे. घोड धरणात ३४.०२ टक्के पाणीसाठ झाला आहे. गेल्या वर्षी धरणात ६२.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.