मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबईदरम्यानच्या अनेक गाड्या साेमवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 09:43 PM2019-08-04T21:43:02+5:302019-08-04T21:44:00+5:30
मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. साेमवारी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे : मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले. काही गाड्यांना विविध स्थानकांवर थांबवून ठेवाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दरम्यान, सोमवारीही काही गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे संपुर्ण रेल्वे वाहतुक कोलमडून गेली आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने सर्व रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. बहुतेक गाड्यांनी तीन ते साडे तीन तासांचा विलंब लागत होता. त्यातच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मंकी हिल जवळ घाटात रेल्वेमार्गावर दरड कोसळली. त्यामुळे पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतुक बंद करावी लागली. परिणामी बहुतेक गाड्या कल्याणहून नाशिक मार्गाने वळविल्या. कसारा घाट परिसरातही जोरदार पावसाने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे बहुतेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवल्या. मुंबईतून पुणे व नाशिककडे जाणारी रेल्वे वाहतूक शनिवारी रात्रीपासून खोळंबली.
रविवारी दिवसभरही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही. त्यामुळे रविवारीही मुंबईच्या दिशेने जाणाºया अनेक गाड्या रद्द केल्या. तर अनेक लांब पल्याच्या गाड्या पुणे, नाशिक किंवा इगतपुरीपर्यंतच धावत होत्या. तसेच कसारा घाटात रेल्वेमार्गावर सातत्याने गाळ येत होता. कसारा स्थानकात रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने नाशिककडे जाणाºया गाड्या खोळंबून राहिल्या. त्यामुळे मुंबईकडे ये-जा करणाºया प्रवाशांचे हाल झाले. त्यांना बस किंवा इतर खासगी वाहनांनी पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी रद्द केलेल्या रेल्वेगाड्या
- मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
- मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
- मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर
- मनमाड-मुंबई-मनमाड एक्सप्रेस
- भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस
- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस
- पुणे-बिलासपुर एक्सप्रेस
- एलटीटी-हातिया एक्सप्रेस
--------------
रविवारी मुंबई ते पुणेदरम्यान अंशत: रद्द रेल्वेगाड्या -
- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस
- एलटीटी-विशाखापट्टण्णम एक्सप्रेस
- मुंबई-चेन्नई एक्सप्रेस
- पनवेल-नांदेड विशेष
- एलटीटी -काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस
- मुंबई-चेन्नई मेल
- एलटीटी -कोईम्बतुर एक्सप्रेस
- मुंबई-भुवनेश्वर कोनार्क एक्सप्रेस
- मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस (मुंबई-दौंडदरम्यान रद्द)
- मुंबई-बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस (मुंबई- सोलापुरदरम्यान रद्द)
- मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस (मुंबई -नाशिकदरम्यान रद्द)
- जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस (मुंबई -इगतपुरीदरम्यान रद्द)