पावसाच्या जोरदार सरींमुळे जिल्हयातील १६ धरणांमधून सोडले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 04:33 PM2019-09-13T16:33:58+5:302019-09-13T16:34:39+5:30
धरणक्षेत्रात गुरुवार पासून शुक्रवार पर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत...
पुणे : शंभर टक्के भरलेली धरणे आणि गुरुवारपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने जिल्ह्यातील १६ धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून खडकवासला धरणातून १३,९८१ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.
धरणक्षेत्रात गुरुवार पासून शुक्रवार पर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. सोमवारी सकाळी सहा पर्यंत पिंपळगाव जोगे २८, माणिकडोह ३२, येडगाव ३५, वडज १८, कळमोडी ३३, चासकमान १८, भामाआसखेड १२, वडिवळे ४०, आंद्रा २३, पवना ३५, कासारसाई १४, मुळशी १९, टेमघर ३०, वरसगाव ३८, पानशेत ३९ आणि खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी आणि निरा देवघरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि येडगाव वगळता सर्वधरणे भरलेली आहेत. त्यातच पाऊस सरी कोसळत असल्याने धरणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी ३,४६८ क्युसेक पाणी मुठानदीत सोडण्यात येत होते. रात्री आठ वाजता त्यात ९,४१६ आणि शुक्रवारी पहाटे दोन वाजता १३,९८१ क्युसेक पर्यंत वाढ करण्यात आली. डिंभे धरणातून ३ हजार १४, घोड दीड हजार, चासकमान १८५०, भामा आसखेड २७४१, वडीवळे १७७६, आंद्रा १६२०, मुळशी ५१३० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. गुंजवणीतून १७८०, निरा देवघर ३३६६ आणि भाटघर धरणातून ७०० क्युसेकने पाणी वीर धरणात जमा होत होते. त्यामुळे वीर धरणातून १३,९६१ क्युसेक पाणी सोडण्यात आले.