जड वाहनांमुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:37 PM2018-11-13T23:37:58+5:302018-11-13T23:38:19+5:30
शिगवे व पारगाव रस्त्याची दुरवस्था : रस्ता सुधारण्याची नागरिकांकडून मागणी
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगवे ते पारगाव भीमाशंकर साखर कारखाना या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जाणारे भरलेले उसाचे ट्रक, जड वाहनांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावरून टायरगाड्या, उसाने भरलेले ट्रक, खासगी वाहने, भाजीपाल्याचे टेम्पो, वाळूची वाहतूक करणारे ट्रक यांची दिवसभरात ये-जा असते. परंतु खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रकचे टायर पंक्चर होणे, ट्रॅक्टर ट्रॉली उलटणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
तालुक्यातील शिंगवे, देवगाव, लाखणगाव, काठापूर इत्यादी गावातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ पारगाव येथे मुख्य बाजारपेठ असल्याने ये-जा करीत असतात. तसेच येथे भीमाशंकर कारखाना असल्याने शिंगवे, जवळे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे, पिंपरखेड या गावातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी भीमाशंकर साखर कारखान्यात येत असतो. त्यामुळे येथील रस्त्याची सुधारणयची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.