विमान जड झाल्याने सामान ठेवले पाटण्यातच, विद्यार्थ्यांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 04:35 AM2018-07-06T04:35:18+5:302018-07-06T04:35:24+5:30
विमानाने प्रवासी पुण्यात आले, तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. विमान जड झाल्याने हे सामान पाटण्यात ठेवण्यात आल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले.
पुणे : विमानाने प्रवासी पुण्यात आले, तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. विमान जड झाल्याने हे सामान पाटण्यात ठेवण्यात आल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. प्रवाशांना याची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
पाटणा ते पुणे अशी नवी विमानसेवा पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळी १० वाजता पाटण्याहून एसजी ३७६ ही फ्लाईट होती. मात्र, काही कारणाने सुमारे ५० मिनिटे उशिराने फ्लाईट निघाली. त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ उलटूनही सामान मिळाले नाही. विमान प्रशासनाकडे अधिक चौकशी केली असता वजन जास्त झाल्याने सामान काढून ठेवल्याचे उत्तर देण्यात आले. यात सुमारे ५० प्रवाशांच्या सामानाचा समावेश आहे.
या सामानात काही प्रवाशांच्या कपड्यांसह घराच्या किल्ल्या, कार्यालयाची कागदपत्रे आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, न विचारता सामान काढून कसे ठेवले? असा सवालही विचारला आहे. याबाबत संबंधित कंपनीने चूक मान्य केली असून, उद्या सामान घरपोच करण्याचा वायदा केला आहे. पण, यामुळे झालेला मनस्ताप आणि होणारे परिणाम यासाठी मनाने कारभार करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करायला हवी, असे मत प्रवासी कौशल झा यांनी व्यक्त केले. विमानतळ प्रशासनाशी संपर्क केला असता तिथून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. अदिती खेतान या पाटण्यातील विद्यार्थिनीचा यात समावेश असून, आज तिला अॅडमिशन घ्यायची होती. मात्र, तिची सर्व कागदपत्रे बॅगेत असून, सर्व सामान पाटण्यात राहिले आहे. अनामिका नावाची विद्यार्थिनीही अडचणीत असून, तिला प्रवेश घ्यायचा असून, कॉलेज आणि होस्टेलसाठी भरलेल्या पैशाचा डीडी असलेली बॅगही आणण्यात आलेली नाही. पुण्यात कोणीही नातेवाईक नसल्याने कोठे राहायचे, हा प्रश्न तिच्यापुढे होता.