अवैध धंद्यामुळे प्रवासी झाले हैराण
By admin | Published: January 13, 2017 03:01 AM2017-01-13T03:01:57+5:302017-01-13T03:01:57+5:30
खडकी रेल्वे स्थानक परिसरात आवाराच्या मध्येच सिमेंट गोडाऊनच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मटका धंदा
खडकी : खडकी रेल्वे स्थानक परिसरात आवाराच्या मध्येच सिमेंट गोडाऊनच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मटका धंदा दिवसाढवळ्या सुरु असून, हाकेच्या अंतरावरच रेल्वे पोलीस चौकी रेल्वे पोलीस कक्ष आहेत व जवळच खडकी पोलीस स्थानक आहेत. या धंद्याची पोलिसांकडे ना दाद , ना फिर्याद आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर शिवाजीनगरपासून पाच किलोमीटर अंतरावर खडकी रेल्वे स्थानक आहे. स्थानकमध्ये २ प्लॅटफॉर्म असून या स्थानकात रोज लोकलच्या १२ फेऱ्या व लांब पल्ल्याच्या ८ ते १० गाड्या थांबतात. औंधरोडपासून नुकताच नवीन पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग पादचाऱ्यांना होत नाही कारण पूल महामार्गाच्या एका बाजूलाच उतरवण्यात आला आहे. खडकी बाजार कडे जाण्यासाठी प्रवाशांना जीव धोक्यात घालून रास्ता ओलांडावा लागतो ,खडकी बाजार कडून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी कोणताही पूल नाही, स्थानकाच्या दोन्हीही प्लॅटफार्मवर एकही उपाहारगृह अथवा कॅन्टीन नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव बाहेर महामार्ग ओलांडून जावे लागते, पोलीस सुरक्षा कक्षात अनेक वेळा पोलीस उपस्थित नसतात. लोकलमध्ये पाकीटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्याबाबत तक्रार करायला गेल्यावर पोलीस कक्षात पोलीस नसतात. तोपर्यंत चोरटे पसार झालेले असतात. या प्लॅटफॉर्मवर तपासणी होत नसल्याने अनेक जण विना तिकीट प्लॅटफॉर्मवर जातात. त्यानंतरच पाकीटमारीच्या घटना घडतात, असे काही प्रवाशांनी सांगितले.
रेल्वेतून पडून अनेक जणांचा मृत्यू होतो. त्यांना तत्काळ उपचार मिळण्याकरिता कोणत्याही सुविधा स्थानकात नाहीत. वेळेत उपचार मिळाल्यास अनेक जणांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.