पुण्यात आवक वाढल्याने भेंडीच्या दरात किंचित घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:26 AM2018-10-25T11:26:42+5:302018-10-25T11:27:06+5:30
फळे,भाजीपाला : आवक वाढल्याने मटार, बटाटा आणि भेंडीच्या दरात काहीशी घट झाली.
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने मटार, बटाटा आणि भेंडीच्या दरात काहीशी घट झाली. मटाराची १३६ क्विंटल आवक झाल्याने भावात क्विंटलमागे ३ हजार रुपयांनी घट झाली. मंगळवारी मटारला क्विंटलमागे ६ ते नऊ हजार रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याची १ लाख १ हजार ४७० क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलमागे ७०० ते १,७०० रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाटाच्या भावात क्विंटलमागे १०० ते दोनशे रुपयांनी घट झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १,४०० ते २,४०० रुपये भाव मिळाला. भेंडीची १६० क्विंटल आवक झाली. त्याचे भाव २ ते साडेतीन हजार रुपयांवरून १ ते ३ हजार रुपयांपर्यंत खाली आले. दरम्यान भाजीपाल्यांचे दर उतरल्याने गृहिणींनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ सणासुदीत दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया गृहिणींनी नोंदविल्या.