दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या, आठवड्यात वाढले तब्बल ५०टँकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 09:19 PM2019-03-09T21:19:58+5:302019-03-09T21:20:12+5:30
पुणे विभागात आठवड्याभरापूर्वी २८० गावांना व २ हजार ५९ वाड्यांमधील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.मात्र,...
पुणे : दुष्काळाची तीव्रता वाढल्याने पुणे विभागातील टँकरची संख्या सुमारे ३५० पर्यंत वाढली आहे. त्यातच दुष्काळामुळे बाधित होणा-या नागरिकांची विभागातील संख्या ७ लाख २१ हजारावर गेली असून ३४ हजार ४३१ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील टँकरने नव्वदी ओलांडली असून सोलापूर जिल्ह्यात आठवड्यात ३५ आणि गेल्या दोन दिवसात तब्बल २० टँकर वाढले आहेत.
पुणे विभागात आठवड्याभरापूर्वी २८० गावांना व २ हजार ५९ वाड्यांमधील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.मात्र,आठ दिवसात दुष्काळाने बाधित झालेल्या गावांची संख्या ३१४ तर वाड्यांची संख्या २ हजार २९४ झाली आहे.पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ७८ असून साता-यात ८३ टँकर सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यावर पावसाने कृपादृष्टी दाखवली.त्यामुळे अद्याप कोल्हापूरात टँकर सुरू झाले नाहीत. सध्या कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत.सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी केवळ १९ टँकर सुरू होते.मात्र,सध्या मंगळवेढ्यातील नागरिकांना ३३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आठवड्याभरापूर्वी ४९ टँकरने सुरू होते.मात्र,जतमधील टँकरची संख्या आठ दिवसात ५७ पर्यंत वाढली आहे.पुणे जिल्ह्यात ७८ टँकर सुरू असून साता-यात ८३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यात आठवड्यापूर्वी १ लाख ६५ हजार ७६८ नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला होता. मात्र,आठवड्यात सोलापूरातील दुष्काळबाधितांची संख्या २ लाख २ हजार ८६८ पर्यंत वाढली आहे.तर साता-यातील बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ८९९ वरून १ लाख ५० हजार झाली असून सांगलीतील संख्या २ लाख ५ हजार ७०८ वरून २ लाख २० हजार ३४९ झाली आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ४८ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित आहेत.
--------------------
जिल्हा व तालुका निहाय टँकर व बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे:
पुणे : आंबेगाव १२,बारामती २१,दौंड ९,हवेली १,इंदापूर १,जुन्नर ३,खेड ४,पुरंदर ९,शिरूर १७
सातारा : माण ५८,खटाव ९,कोरेगाव १३,फलटण २,
सांगली : जत ५७, कवठेमहाकाळ ८,तासगाव ३ ,खानापूर ७,आटपाडी २०,
सोलापूर : सांगोला २०,मंगळवेढा ३३,माढा ६,करमाळा १२,माळशिरस ४, मोहोळ ४,दक्षिण सोलापूर ५,उत्तर सोलापूर २,अक्कलकोट २, बार्शी २