Corona Alert: पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे Antigen चाचण्यांचेही प्रमाण वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:35 AM2022-01-06T11:35:56+5:302022-01-06T11:36:04+5:30
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी काळात आरटीपीसीआरपेक्षा अँटिजन चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
पुणे : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी काळात आरटीपीसीआरपेक्षा अँटिजन चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. सध्या पुणे शहरामध्ये ८५ टक्के आरटीपीसीआर, तर १५ टक्के अँटिजन चाचण्या होत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात अँटिजन किटचे प्रमाण वाढवले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांत शहरात दररोज ६ ते ७ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील ७०० ते एक हजार बाधित आढळून येत आहेत. बुधवारी शहरात १३ हजार ४४३ चाचण्या झाल्या. बाधितांची वाढती संख्या पाहता चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही वाढवले जाणार आहे. पहिल्या लाटेत एका व्यक्तीमागे १५ जणांचे, तर दुसऱ्या लाटेत २०-२२ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात होते. सध्या एका व्यक्तीमागे ८ ते १२ जणांचे ट्रेसिंग केले जात असून, बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा ट्रेसिंगचा आकडा २०-२२ पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एका दिवशी सर्वाधिक ९ ते १० हजार चाचण्या करण्यात येत होत्या. त्यावेळी केवळ आरटीपीसीआर उपलब्ध होती. दुसऱ्या लाटेत आरटीपीसीआरसह अँटिजन चाचण्यांची संख्याही वाढवली. त्यावेळी दिवसात सर्वाधिक २७ हजार चाचण्या झाल्या. सध्या खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांपैकी ८५ टक्के आरटीपीसीआर आणि १५ टक्के अँटिजन चाचण्यांची संख्या आहे.
''पहिल्या लाटेत आरटीपीसीआर त्यानंतर दुसऱ्या लाटेत आरटीपीसीआर, अँटिजन चाचण्याही केल्या जाऊ लागल्या. सध्या ८५ टक्के आरटीपीसीआर, तर १५ टक्के अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार, आगामी काळात चाचण्यांचे नियोजन केले जाईल असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.''
५ आठवड्यांमधील चाचण्यांची संख्या :
कालावधी एकूण चाचण्या आरटीपीसीआर अँटिजन
३० नोव्हें-६ डिसें. ३७,०९० ३१,८७७ ५,२१३
७ - १३ डिसें. ४०,४१९ ३४,८६९ ५,५५०
१४-२० डिसें. ३९,८३२ ३४,५१७ ५,३१५
२१-२७ डिसें. ४२,९७३ ३७,५३५ ५,४३८
२८ डिसें.-३ जाने ४५,३५२ ३९,५०१ ५,८५१