उरूळी कांचन येथे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून टळला अनर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:36 PM2018-07-31T14:36:37+5:302018-07-31T15:15:03+5:30
मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले.
उरूळी कांचन : मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (३०जुलै) हवेली तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान येथे आंदोलनकर्ते व व्यापारी यांच्यात बाचाबाची व नंतर मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पण या वादाला वेगळीच किनार असल्याची नागरिकांमधील दबक्या आवाजातील चर्चेची पोलिसांनी नोंद घेतली असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.त्यात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंदच्या आंदोलनास उरुळी कांचन मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. त्यामुळे आज पुन्हा बंद पाळण्याबाबत व्यापारी वर्गात द्विधा मनस्थिती होती. त्यानुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि अतिरिक्त कुमक मागवून उरुळी कांचन शहरात बंदोबस्तासाठी तैनात केला. मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंदच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वत:हून दुकाने बंद ठेवली होती. परंतु, महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू ठेवले होते. मराठा संघटनांच्या सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी विद्यालय येथे मोर्चा नेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काहींनी विरोध दर्शविला. यादरम्यान, व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात ठिय्या आंदोलन करत निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मंडलअधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देत आरक्षण मिळाले पाहिजेचा नारा दिला व ते जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत ते चालूच राहील, असा इशारा दिला.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करत सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.