तपासाअभावी वाहनचोर मोकाटच

By admin | Published: March 12, 2016 01:47 AM2016-03-12T01:47:37+5:302016-03-12T01:47:37+5:30

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून गेल्या चार वर्षांत तब्बल ११ हजार वाहने चोरीला गेली असून, यातील केवळ २ हजार ५१ वाहनेच पोलीस शोधू शकले आहेत

Due to lack of check, | तपासाअभावी वाहनचोर मोकाटच

तपासाअभावी वाहनचोर मोकाटच

Next

लक्ष्मण मोरे, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून गेल्या चार वर्षांत तब्बल ११ हजार वाहने चोरीला गेली असून, यातील केवळ २ हजार ५१ वाहनेच पोलीस शोधू शकले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये झालेली ही वाढ चिंताजनक असून, वाहनचोरीच्या गुन्ह्यांमागे असलेले मोठे ‘अर्थकारण’ही त्याला जबाबदार आहे. कष्टाच्या कमाईमधली पै-पै जमा करून खरेदी केलेले वाहन चोरीला गेल्यानंतर हे वाहन परत मिळेल, या आशेवर नागरिकांना पाणी सोडावे लागते. पोलिसांची या गुन्ह्यांच्या तपासाबाबतची उदासीनता कधी दूर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्याच्या प्रचलित ‘टे्रंड’नुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून दिवसाला आठ वाहने चोरीला जातात. सर्वसामान्यांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी फायनान्स कंपन्यांचे मोठ्या व्याजदराचे कर्ज घेऊन वाहने घेतलेली असतात. त्यांची वाहने चोरीला गेल्यानंतरही या बँका मात्र त्यांच्यामागचा तगादा सोडत नाहीत. पोलिसांची वाहनचोरांविरुद्ध कारवाई सुरू असली तरी तिचा वेग मात्र अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षांत शहरांमधून चोरलेली वाहने राज्याच्या ग्रामीण भागात तसेच परराज्यांमध्ये नेऊन विकण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. यासोबतच चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, सोनसाखळीचोऱ्यांसाठीही चोरीच्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
चोरीला गेलेली वाहने शोधण्याचे तसेच या वाहनांचे नंतर नेमके होते काय, याचा शोध घेण्याचे ‘कर्तृत्व’ मात्र पोलीस दाखवताना दिसत नाहीत. उलट वाहनचोरीची तक्रार दाखल करायला गेल्यानंतर केवळ तक्रार अर्जावर भागवले जाते. वाहनमालकाला थातुरमातुर उत्तरे देऊन टोलवले जाते. वास्तविक तक्रारदाराची तक्रार विनाविलंब नोंदवून घेणे बंधनकारक आहे. गुन्हे शाखेचे वाहनचोरीविरोधी पथकही तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षकाच्या ‘कर्तबगारी’मुळे बंद करावे लागले होते.
> भंगार दुकानांवर हवा ‘वॉच’
गेल्याच आठवड्यात सिंहगड रोड पोलिसांनी वाहनांची चोरी करून त्याचे तुकडे करून भंगारात विक्री करणाऱ्या टोळीच्या दोघांना अटक केली आहे. शेकडो गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांनी आतापर्यंत शेकडो वाहनांचे रूपांतर भंगारात केले आहे. अशा संशयास्पद भंगार दुकानांवर वॉच ठेवून वारंवार तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
बनावट चाव्या
आणि नंबरप्लेट मिळतातच कशा?
वाहने चोरण्यासाठी सर्वाधिक वापर हा बनावट चावीचा होतो. अशा प्रकारच्या ‘मास्टर की’ किंवा बनावट चाव्या तयार करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणे आवश्यक आहे. यासोबतच चोरीच्या दुचाकीवर बनावट नंबरप्लेट लावून चोऱ्या केल्या जातात. त्यामुळे वाहनांवर बनावट नंबरप्लेट बसविण्यासाठी मदत करणाऱ्या नंबरप्लेट दुकानदारांवर नजर ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
> कोंढवा पोलिसांनी एका उच्चभ्रू सोनसाखळी चोरट्याला अटक केली होती. त्याने २० पेक्षा अधिक वाहने चोरून त्यावरूनच ५० पेक्षा अधिक महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसकावल्याचे समोर आले होते. यासोबतच फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवण्यासाठीही दहशतवाद्यांनी चोरीच्या दुचाकीचा वापर केला होता. ही दुचाकी सातारा न्यायालयाच्या आवारामधून चोरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Web Title: Due to lack of check,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.