आश्वासनांची पूर्तता न झाल्याने धनगर समाज सरकावर नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:48 AM2018-05-14T03:48:52+5:302018-05-14T03:48:52+5:30
धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत.
पुणे : धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे धनगर समाज केंद्र व राज्य शासनावर नाराज आहे, अशी कबुली जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली.
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती महोत्सव समितीच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बार्टी) अहवाल धनगर आरक्षणाच्या विरोधी येत होता. बार्टीचा अहवाल दोन वेळा विरोधी आल्यामुळे शासनाने ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस’च्या (टीआयएसएस) सर्वेक्षण समितीकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली. या समितीचा अहवाल धनगर समाजाच्या बाजूने येईल, अशी आमची अपेक्षा आहे. एकदा मंत्रीमंडळ बैठकीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विषय चर्चेसाठी आला होता. मात्र, त्यावर काही मतमतांतरे समोर आल्यामुळे उपसमिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडूनही अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल.