पशुधन घटल्याने शेणखत झाले दुर्मिळ
By admin | Published: June 14, 2014 01:52 AM2014-06-14T01:52:33+5:302014-06-14T01:52:33+5:30
मावळच्या ग्रामीण भागात पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेतीसाठी वरदान असणारे शेणखत, लेंडीखत दुर्मिळ झाले आहे
कामशेत : मावळच्या ग्रामीण भागात पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेतीसाठी वरदान असणारे शेणखत, लेंडीखत दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर शेतकरी जास्त करू लागले आहेत.
मावळात लोणावळा, तळेगाव, देहूरोड ही शहरे सोडून सुमारे दीडशेहून अधिक गावे आहेत. सध्या तालुक्यात सुमारे १५ ते २० हजार एवढीच जनावरे आहेत.
गावागावातून मागील २० वर्षांपासून असणारी जनावरांची लाखोंची संख्या कमी झाली आहे. जनावरांना चरण्यासाठीच्या गायरान, गायचरण, माळरानांची विक्री झाली. तेथे इमारती उभ्या राहिल्याने जनावरे पाळणेही कठीण झाले आहे. सुमारे ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे घरगुती दुग्ध उत्पादनासाठी गाय किंवा एखादी म्हैस आहे. कामासाठी एक बैलजोडी आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ५०, १०० जनावरांचा कळप अन् गोठाही काळाच्या ओघात नाहीसा झाला. पशुधनातून लेंडीखत मिळवून देणाऱ्या शेळ्याही कमी झाल्या आहेत.
लेंडीखत व गाय, म्हैस, बैलापासून मिळणारे शेणखतही पूर्णपणे कमी झाले आहे. शेणखताचे उकिरडे, शेणकई आता दिसत नाही. शेतकरी घरासमोर खोल खड्डा खोदून त्यात शेण, लेंडीची साठवणूक करतात. गोठ्यातील वैरणीचा कचरा, घरगुती कचरा, यापासून वर्षभर या खड्ड्यात शेणखत तयार होते. आता मात्र शेणखत एका गावात पाच-सहा शेतकरीच तयार करतात. काही शेतकरी हे खत विकतातही.
सध्या शेणखत २५०० रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने विक्री होत आहे. मात्र, तरीही खेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे भात, भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात थेट रासायनिक खतांचा वारेमाप वापर सुरू केला आहे. यामुळे जमिनीचा पोतही खराब होतो. अन् उत्पादनही कमी होत चालले आहे. त्यामुळे रासायनिक खते शेतीला घातक ठरत आहेत.
याबाबत कृषिअधिकारी पुरुषोत्तम वाणी म्हणाले, ‘‘जैविक खतनिर्मितीसाठी शासन अनुदान देते. परंतु, त्याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. शेणखताची उपलब्धता कमी झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. (वार्ताहर)