पावसाअभावी भातपिके सुकू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:14 AM2021-08-28T04:14:05+5:302021-08-28T04:14:05+5:30
भोर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरड-माती, झाडे-झुडपे खाली येऊन भातखाचरे गाडली तर नदीनाले ओढ्याच्या काठावरील भातखाचरांत पाणी ...
भोर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरड-माती, झाडे-झुडपे खाली येऊन भातखाचरे गाडली तर नदीनाले ओढ्याच्या काठावरील भातखाचरांत पाणी जाऊन खाचरे गाडली. मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने भातखाचरातील पाणी कमी होऊन खाचरात वड्या पडल्या आहेत. पाणी नसल्यामुळे भाताची रोपे सुकून पिवळी पडू लागली आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बळीराजा चिंतातुर होऊन पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे सात हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. भाटघर व नीरा देवघर धरणभाग महुडे खोरे या भागाला भाताचे आगार समजले जाते. या जिरायती भागात भात सोडून इतर पीक घेतले जात नाही. या वर्षी ५० हेक्टवर भाताचे बी पेरले होते. पावसाच्या पाण्यावर भाताचे पीक घेतात. पाऊस अधिक झाला तरी पीक खराब होते आणि पाऊस कमी पडला तरी पीक येत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर भाताचे पीक घेतात. मात्र अतिवृष्टीने भाताचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांना भाताचे खाचरच शिल्लक राहिलेले नाही. आणि राहिलेल्याची दुरुस्त करण्याची ऐपत नाही. यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडलेला आहे.
२७ भोर