लोकमत पाहणी - निवाराशेडअभावी विद्यार्थी, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:35 AM2019-01-07T01:35:33+5:302019-01-07T01:36:05+5:30
देहूरोड-निगडी रस्ता : महामार्ग चौपदरीकरणानंतरही दुर्लक्ष
देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गाचे देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे सहा महिन्यांपूर्वी चौपदरीकरण पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. मात्र महामार्गाचे चौपदरीकरण करताना विविध बसथांब्यांवरील काढलेले निवारा शेड पूर्ववत उभारण्यात आले नसल्याने परिसरातील प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात थांबून बसची वाट पाहावी लागत आहे. निवारा शेड उभारण्यास आणखी किती दिवस लागणार, असा सवाल प्रवासी व विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द ते देहूरोड पोलीस ठाण्याजवळील सेंट्रल चौक दरम्यानच्या रस्त्याचे सव्वासहा किलोमीटर (किमी २०.४०० ते किमी २६.५४०) लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण कामाचे आदेश मुंबई येथील एका कंत्राटदारास डिसेंबर २०१६ मध्ये देण्यात आल्यानंतर संबंधित रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. रस्त्याचे निर्धारित वेळेत जून २०१८ मध्ये चौपदरीकरण झाले आहे. रुंदीकरण झालेल्या भागातून वाहतूक सुरूझाली आहे. देहूरोड ते निगडी दरम्यानच्या भागातील रुंदीकरण करताना विविध ठिकाणी बसथांब्यांवर असलेले निवारा शेड काढण्यात आले होते. रस्त्याचे काम होऊन सहा महिने उलटूनही संबंधित ठिकाणी पुन्हा शेड उभारण्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
संत तुकाराममहाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी देहूरोड वीरस्थळाजवळ निवारा शेड नसल्याने गैरसोय होत आहे. महामार्गालगत विद्यार्थी व प्रवासी बसची वाट पाहत धोकादायकरीत्या उभे राहत आहेत. त्यामुळे देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना बसथांब्यांवर निवारा शेड उभारून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. देहूरोड ते निगडी दरम्यान बस थांब्यांवर निवारा शेड उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, महिलाध्यक्षा शीतल हगवणे, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, धनंजय सावंत, भाजपाचे सूर्यकांत सुर्वे, शिवसेनेचे संघटक संदीप गोंटे यांनी रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.
लवकरच होणार कामास सुरुवात
देहूरोड ते निगडी दरम्यान विविध ठिकाणी बसथांब्यांवर निवारा शेड पूर्ववत उभारण्यासाठी रस्त्याचे काम करणाºया संबंधित कंत्राटदारास सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम सुरु झाले नसल्याने माहिती घेण्यात येत आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याबाबत पुन्हा सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर तातडीने कामे सुरू होतील.
- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ, मुंबई