पर्यंटकांअभावी वरंध घाट सुना सुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:51+5:302021-06-28T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील निसर्ग बहरला आहे. हिरवेगार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील निसर्ग बहरला आहे. हिरवेगार झालेले डोंगर आणि डोंगरातून फेसाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक दर पावसाळ्यात वरंध घाटाला पसंती देत असतात. मात्र, या वर्षी कोरोनामुळे निर्सग पर्यटनाला बंदी करण्यात आली आहे. यामुळे वरंध घाट पर्यटकांअभावी सुना सुना झाला आहे. याचा परिणाम येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर झाला आहे.
भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर धरण भागात व भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटातील हिरव्यागार डोंगर दऱ्यातून फेसाळत वाहणारे पाणी आणि उंचावरून कोसळणारे धबधबे पाहण्यास व त्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात वरंध घाटात येत असतात. या शिवाय नेकलेस पाँईट, भाटघर निरादेवघर धरण पाहायलाही अनेक हौशी पर्यटक दरवर्षी येत असतात. कोरोना नियम शिथिल झाल्यावर शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी तालुक्यात गर्दी होत होती. शहरी भागातील बाधितांची टक्केवारी कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात ती अद्यापही कमी आलेली नाही. तसेच वाढत्या गर्दीमुळे आणि तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पुन्हा कोरोनाबाधितांची संख्याही वाढण्याची भीती आहे. यामुळे प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी तालुक्यात पर्यटनाला बंदी घालती आहे. यामुळे पर्यटक तालुक्यात फिरकलेले नाहीत. यामुळे एरवी पावसाळ्यात ओसंडून वाहनारा घाट रविवारी सुना सुना पडला होता.
चौकट
भोर-वरंध घाटाचा मार्ग हा कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे अनेक पर्यटक आणि चाकरमानी उद्योग व्यवसाय करणारे भोर मधून कोकणात जाण्यासाठी या मार्गाचाच अवलंब करतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने पर्यटन स्थळे व किल्ल्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून पर्यटक आले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे फारसे पर्यटक भोरला पर्यटनासाठी येत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
चौकट
भोर-महाड रस्त्यावरील चुलीवरचे मटण, रस्सा भाकरी या हॉटेल व्यावसायिकांबरोबरच चहा, वडापाव, कांदा भजी, पिठल भाकरी, कणसे विकणारे छोटे व्यावसायिकांचे पर्यटक नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसभर वाट बघूनही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांव्यतिरिक्त क्वचित ग्राहक दुकानात येत असतात. यामुळे धंदा होत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे हाॅटेल व्यावसायिक संदीप धामुणसे यांनी सांगितले.
फोटो :