सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने ‘उजनी’ त घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:00 PM2019-04-02T20:00:23+5:302019-04-02T20:05:39+5:30
उजनी धरण हे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे.
भिगवण :उजनी धरणातूनसोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होवून पाणीसाठा मृत साठ्यात गेला आहे. परीणामी शेतकरी वर्गासह नदीकाठावरच्या गावांवरील पाणी संकट गडद झाले आहे. मंगळवारी (दि २) सकाळी धरणाची पाणीपतळी वजा २२.४२ टक्के एवढी झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.
उजनी धरण हे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणापेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृतसाठ्याबाबत राज्यातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाते. यंदा प्रथमच उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये गेला आहे. कारण दरवर्षी उजनी धरण एक मे च्या आसपास मायनस मध्ये येते. मागील वर्षी २३ मे पर्यंत उजनी अधिक मध्ये होते. मात्र ,यावर्षी दोन ते अडीच महिने अगोदरच उपयुक्त पाणी संपला आहे. यामुळे ऐन दुष्काळात तेरावा महिना उजाडण्याची भीती शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.
सोलापूरला शहराला पाणी पाइपलाइनद्वारे नेणे गरजेचे आहे.मात्र, उजनीतन ते पाणी नदीद्वारे सोडले जात असल्याने या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातुन उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट होते. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या शेतीसाठी या पाण्याचा वापर होत आहे. नदीद्वारे पाणी सोडू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी वेळोवेळी केली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता खाली पाणी सोडल्याने उजनी जलाशयावरील जवळजवळ सर्वच पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसणार आहे. सोलापूरला पिण्यासाठी पाणी पाहिजे, परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना यामुळे बंद पडणार आहेत त्याचे काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. उजनीच्या पाण्याचा विचार करताना, प्रथम मूळ धरणग्रस्त, उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांचा विचार केला जात नाही .धरण निर्मितीपासून पाणी नियोजनासाठी उजनी धरण प्राधिकरण मंडळाची निर्मितीची मागणी धुळखातच पडली आहे.
सध्या निवडणूकीची धामधूम सुरू असल्याने मतांच्या जोगव्यासाठी भाजप सरकारने पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने निवडणूकीच्या प्रचारात उजनीचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. सोडलेल्या पाण्यावर मते मिळणार असली दुष्काळाची दाहकता नक्कीच वाढणार आहे.