सोलापूरला पाणी सोडल्याने ‘उजनी’त घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:53 PM2019-04-02T22:53:38+5:302019-04-02T22:53:48+5:30
उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते
भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीसाठा मृत साठ्यात गेला आहे. परिणामी शेतकरीवर्गासह नदीकाठावरच्या गावांवरील पाणी संकट गडद झाले आहे. मंगळवारी (दि. २) सकाळी धरणाची पाणीपतळी वजा २२.४२ टक्के एवढी झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली.
उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते. यंदा प्रथमच उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये गेला आहे. कारण दर वर्षी उजनी धरण १ मेच्या आसपास उणे होते. मागील वर्षी २३ मेपर्यंत उजनी अधिकमध्ये होते. मात्र, या वर्षी दोन ते अडीच महिने अगोदरच
उपयुक्त पाणी संपले आहे. यामुळे
ऐन दुष्काळात तेरावा महिना उजाडण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
नदीद्वारे पाणी न सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी....
सोलापूर शहराला पाणी पाईपलाईनद्वारे नेणे गरजेचे आहे. मात्र, उजनीतून ते पाणी नदीद्वारे सोडले जात असल्याने या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातून उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट होते. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या शेतीसाठी या पाण्याचा वापर होत आहे. नदीद्वारे पाणी सोडू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी वेळोवेळी केली आहे.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता खाली पाणी सोडल्याने उजनी जलाशयावरील जवळजवळ सर्वच पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसणार आहे. सोलापूरला पिण्यासाठी पाणी पाहिजे; परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना त्यामुळे बंद पडणार आहेत त्याचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.
उजनीच्या पाण्याचा विचार करता, प्रथम मूळ धरणग्रस्त, उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांचा विचार केला जात नाही. धरण निर्मितीपासून पाणी नियोजनासाठी उजनी धरण प्राधिकरण मंडळाची निर्मितीची मागणी धूळ खातच पडली आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने मतांच्या जोगव्यासाठी भाजप सरकारने पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने निवडणुकीच्या प्रचारात उजनीचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. सोडलेल्या पाण्यावर मते मिळणार असली तरी दुष्काळाची दाहकता नक्कीच वाढेल.