पॉझिटिव्हिटी दर कमी नसल्याने आठवडे बाजार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:41+5:302021-06-18T04:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे निर्बंध अजूनही शिथिल झालेले नाही. यामुळे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे निर्बंध अजूनही शिथिल झालेले नाही. यामुळे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे स्रोत असलेले जिल्ह्यातील आठवडे बाजार अद्यापही बंदच आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाला विक्री होत आहे. पॉझिटिव्हिटी दर कमी आला तरच निर्बंध उठणार आहे. इंदापूर तसे वेल्हे तालुक्यातील आढवडी बाजार सुरू झाले आहेत.
जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे आठवडे बाजार आहेत. नारायणगाव, जुन्नर, बेल्हा, राजगुरुनगर, मंचर, बारामती, इंदापूर या ठिकाणी आठवड्याचा भाजीपाला, तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रामस्थ, तसेच मजूरवर्ग हा बाजारात येत असतो. सध्या शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. भाजीपाल्याबरोबरच शेतीसाठी लागणारे साहित्याची दुकानेही या बाजारात असतात. मात्र, ग्रामीण भागातील कोरोनावाढीचा दर हा जास्त आहे. तो आटोक्यात न आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील गावोगावी भरणारे आठवडे बाजार हे बंद आहेत.
मात्र, तरकारी तसेच भाजीपाल्याची ठोक खरेदी-विक्री करणारे मोठे बाजार काही अंशी सुरू आहेत. गेल्या शनिवारी चाकण येथील बाजार दोन महिन्यांनी सुरू झाला. बाजारात खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. कोरोना नियमावलीचा फज्जा उडालेला दिसला. जुन्नर तालुक्यातील ओतूर, आळेफाटा येथील मोठे बाजार सुरू झालेले आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. काही ग्रामस्थ नियम पाळतात, तर काही ग्रामस्थ नियमांची पायमल्ली करत आहेत.
सध्या रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले, तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चाैकट
चाकण बाजारात झुंबड
चाकण येथील शनिवारी भरणाऱ्या मोठ्या बाजारात शनिवारी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. हा बाजार तरकारी आणि कांद्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून हा बाजार बंद होता. शनिवारी तो सुरू झाला. पहिल्या दिवशी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुबंड उडाली होती. कोरोना नियमावलीला काही प्रमाणात हरताळ फासला गेला होता.
चौकट
किरकोळ बाजार सुरू
जिल्ह्यात किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची विक्री सुरू आहे. या ठिकाणी ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. मास्ककारवाई ग्रामपंचायतीने कठोर केल्यामुळे मास्क सर्वांच्या ताेंडावर असतो. पण काही ठिकाणी याचे उल्लंघनही होत आहे.
चौकट
व्यापाऱ्यांकडून नियमावलीचे पालन
मोठ्या बाजारात कोरोना नियमावलीचे पालन केले जात आहे. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. यानंतर त्या बाजारात सोडण्यात येतात. बाजारात येणाऱ्या सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
कोट
फोटो : ओतूर येथील कांदा बाजारात उपस्थित असलेले व्यापारी.