माहिती अधिकार कायद्याच्या वापरामुळे नव्हे तर पैशाच्या वादातून विनायक शिरसाट यांचा खुन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:55 PM2019-02-16T12:55:34+5:302019-02-16T12:56:41+5:30
माहिती अधिकाराखाली त्यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात आवाज उठविल्यामुळे विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता़.
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट यांचा माहिती अधिकार कायद्याच्या वापरामुळे नव्हे तर पैशाच्या देवाण घेवाणीवरुन झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे़. शिरसाट यांचा खुन करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यामागील कारण स्पष्ट झाले आहे़.
धरमप्रकाश कतार्राम वर्मा (वय ३८, रा़ रिव्हरव्हयु सोसायटी, शिवणे) असे या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे़. वर्मा याचा पी ओ पी चा व्यवसाय आहे़. पी ओ पी मालाच्या पैशाचे देवाण घेवाणी वरुन वर्मा याने विनायक शिरसाट यांच्याशी वाद होऊन भांडणे झाले होते़. त्यावेळी शिरसाट याने वर्मा याला शिवीगाळ केल्याचा राग होता़. त्यामुळे धरमप्रकाश वर्मा याने मुक्तारअली व फारुख खान यांच्याशी संगनमत करुन ३० जानेवारीला विनायक शिरसाट यांना कारमधून घेऊन जाऊन हाताने मारहाण व शस्त्राने वार करुन ठार मारले व त्याचा मृतदेह मुठा गावाच्या जवळ असलेल्या घाटात टाकून दिला होता़.
माहिती अधिकाराखाली त्यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात आवाज उठविल्यामुळे विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता़. त्यांच्या वडिलांनी अनेक बांधकाम व्यवसायिकांची नावे संशयित म्हणून पोलिसांकडे दिली होती़ त्यामुळे सुरुवातीला पोलिसांचा संशय त्यावरच केंद्रित झाला होता़.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट ३ करीत असताना दोन संशयित तेलंगणा राज्यातील मेहबुबाबाद येथै असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे व हवालदार मेहबुब मोकशी यांना मिळाली़. त्यानुसार मेहबुबाबाद येथे जाऊन मुक्तारअली मसीहुद्दीन अली (वय ३४, रा़ लिपाणे वस्ती, आंबेगाव) आणि महंमद फारुख इसहाक खान (वय २८, रा़ उत्तमनगर) यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वर्मा यानेच त्यांचा खुन केल्याचे स्पष्ट झाले होते़. वर्माला पकडल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली़
प्रभारी अपर पोलीस आयुक्त ज्योतीप्रियासिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहायक निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, सहायक फौजदार किशोर शिंदे, अनिल शिंदे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, हवालदार मेहबुब मोकाशी, प्रविण तापकीर, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, रोहिदास लवांडे, विल्सन डिसोझा, संदीप राठोड, अतुल साठे, सचिन गायकवाड, सुजित पवार, कैलास साळुंखे यांनी ही कामगिरी केली़