चाचण्या अधिक झाल्याने पुण्याची रुग्णसंख्या आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:32+5:302021-05-23T04:10:32+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या शहराच्या यंत्रणेवर प्रचंड ताण होता. या कठीण परिस्थितीमध्ये देखील पुणे ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या शहराच्या यंत्रणेवर प्रचंड ताण होता. या कठीण परिस्थितीमध्ये देखील पुणे पालिकेने अतिशय संवेदनशीलपणे काम केले. पुणे, नागपूर या शहरात मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे लागणार असून त्यादृष्टीने तयारी करण्याची सूचना त्यांनी केली.
पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या वेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर ऑनलाइन सहभागी झाले होते. तर महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, पालिकेने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. या उपकरणाचा फायदा पालिकेच्या सर्व रुग्णालयांना होणार आहे. तिसर्या लाटेची तयारी करावी लागणार आहे. दुर्दैवाने लहान मुलांना संसर्ग होण्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याने वैद्यकीय साहित्य, तज्ज्ञ डॉक्टर यांची टीम तयार ठेवण्याची आवश्यकता आहे.
----
शहरात सुरुवातीच्या काळात वाढलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अधिकाधिक तपासण्या करण्यावर अधिक भर दिला. ऑक्सिजन तुटवडा अनेक वेळा जाणवला. त्यामुळे ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने पालिकेमार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर