नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील अठरा हजाराहून अधिक हेक्टर शेती क्षेत्रं झालं बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 09:07 PM2018-09-01T21:07:36+5:302018-09-01T21:09:10+5:30
पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम हाेणार असून नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र बाधीत झाले अाहे.
पुणे: पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. तर नांदेड,नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस,सोयाबीन,भात,मुग,तूर,ज्वारी बाजरी आदी पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.तसेच राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे.
राज्याच्या कृषी विभागातर्फे १ जून ते २४ आॅगस्ट या कालावधीचा खरीप हंगामाचा कृषी पिक पेरणी व पिक परिस्थितीचा अहवाल अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात ऊस वगळून १३४.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के)पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक, औरंगाबाद ,अहमदनगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातारा, सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात पावसात खंड पडला आहे. तसेच काही भागात किड व रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याचे कृषी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यात रोपवाटीकेतील रोपांचे आयुर्मान जास्त झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे. तसेच पावसातील खंडामुळे उडीद ,मुग व जिरायत कापूस पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धुळे, नंदरबार व जळगाव जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून कमी पर्जन्यमानामुळे सातारा जिल्ह्यातील बाजरी पिकाची वाढ खुंटली आहे. तर सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पावसआभावी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.मात्र,पुणे विभागात अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिक स्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होत आहे.
दरम्यान,औरंगाबाद जिल्हातील काही तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे कापूस,मका व मुग पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. बीड व जालना जिल्ह्यात काही तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. या उलट नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व मुक पिके पिवळी पडू लागली आहेत. पावसाचा खंड पडल्याने अमरावती विभागातील हलक्या जमिनीमधील सोयाबीन पिकात फूल गळ झालेली दिसून येते,असेही कृषी अहवालात नमूद केले आहे.
कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव
राज्यात कापूस पिका खाली २६ जिल्हे असून एकूण २० हजार १६० गावामध्ये कापूस पिकाची पेरणी झालेली आहे.त्यापैकी १६ ते २२ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ३०३ (२६ टक्के)गावांमध्ये कीड व रोगासाठी सर्वेक्षण करण्यात आले.गेल्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात बोंडअळीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर अढळून आलेली आहे.