पेशवे उद्यानातील शिवसृष्टी निधीअभावी अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:18 PM2019-09-25T13:18:51+5:302019-09-25T13:23:27+5:30

फुलराणीच्या टेकडीवर उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’चे कामही दोन वर्षांपासून अपूर्ण पडले असून, येथे साकारलेल्या समूह शिल्पांची दुरवस्था होऊ लागली आहे... 

due to no funds incomplete peshave park Shiv srushti | पेशवे उद्यानातील शिवसृष्टी निधीअभावी अपूर्ण

पेशवे उद्यानातील शिवसृष्टी निधीअभावी अपूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देखेळण्यांची दुरवस्था  : केवळ नावालाच उरले ऊर्जा उद्यान; उपकरणेही पडली बंदसाधारणपणे २0१६ साली सुरू झालेले हे काम एक वर्षानंतर पडले बंद शिवसृष्टीची बारा समूहशिल्पे ऊन-वारा-पावसात खराब होऊ लागलीफुलराणी दिवाळीपूर्वी होणार का सुरू?

लक्ष्मण मोरे - 
पुणे : सारसबागेजवळील पेशवे पार्क हे केवळ नावालाच ऊर्जा उद्यान उरले असून, उद्यानातील अपारंपरिक ऊर्जा उपकरणे बंद पडली आहेत. फुलराणीच्या टेकडीवर उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’चे कामही दोन वर्षांपासून अपूर्ण पडले असून, येथे साकारलेल्या समूह शिल्पांची दुरवस्था होऊ लागली आहे. 
महापालिकेच्या वतीने पेशवे उद्यानामध्ये तत्कालीन नगरसेवक अशोक हरणावळ यांच्या निधीमधून  ‘शिवसृष्टी’ उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी सल्लागाराची नेमणूकही करण्यात आली. साधारणपणे २0१६ साली सुरू झालेले हे काम एक वर्षानंतर बंद पडले. दरम्यान, महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांनंतर आलेल्या सत्ताधारी भाजपचे याकडे दुर्लक्ष झाले. निधीअभावी दोन वर्षांपासून हा प्रकल्प अर्धवट पडला आहे. या ठिकाणी दगड, माती आणि खडीचे ढिगारे तसेच पडलेले असून, शिवसृष्टीची बारा समूहशिल्पे ऊन-वारा-पावसात खराब होऊ लागली आहेत. शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शविणारी ही शिल्पे आहेत. पालिकेने त्यासाठी दीड कोटी रुपयांची तत्कालीन अंदाजपत्रकात तरतूद केली होती. 
यासोबतच या ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले असून, हे खड्डे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही धोकादायक आहेत. फुलराणी पाहण्यासाठी येणाºयांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. कोट्यवधींचा खर्च करून झाल्यावर केवळ निधी नसल्याचे कारण देत शिवसृष्टीचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. 
........
फुलराणी दिवाळीपूर्वी होणार का सुरू?
उद्यानात येणाऱ्या बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही आकर्षित करणारी ‘फुलराणी’ गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंद पडली आहे. देखभाल दुरुस्तीवरून निर्माण झालेल्या अडचणीमुळे फुलराणी बंद ठेवण्यात आल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या व्हेईकल डेपोने याविषयी तत्परता दाखवत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. नुकताच गणेशोत्सव संपला आहे. शाळेच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना दिवाळीच्या लांबलचक सुट्या लागतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी तरी फुलराणी रुळावर यावी, अशी अपेक्षा आहे.
.........
ऊर्जा उद्यान केवळ नावालाच
महापालिका तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पेशवे ऊर्जा उद्यान उभारले होते. या उद्यानाचे उद्घाटन २00५ साली तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केले होते. या उद्यानामध्ये विविध वैज्ञानिक खेळणी बसविली होती. तसेच साहसी खेळ खेळण्यासाठीची खेळणीही बसविलेली होती. काही खेळण्यांमधून ऊर्जा निर्माण होऊन त्याचा वापरही केला जात होता. परंतु, यातील बरीचशी ऊर्जा खेळणी नादुरुस्त आहेत.
............
फुलराणीच्या टेकडीवर पायथागोरसचे प्रमेय, दृष्टीची चकती, न्यूटनचा तिसरा नियम, घर्षण आणि गती, म्यूजिकल ट्यूब, न्यूटनची रंगीत चकती, कोनात्मक गती, बार्टनचा लोलक, तरंगता पक्षी, गुरुत्व चेंडू अशी वेगवेगळ्या प्रकारची वैज्ञानिक खेळणी आणि त्यामागील विज्ञानाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती. परंतु, ही सर्व खेळणी बंद पडली असून, या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

Web Title: due to no funds incomplete peshave park Shiv srushti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.