बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल
By Admin | Published: March 27, 2017 02:04 AM2017-03-27T02:04:21+5:302017-03-27T02:04:21+5:30
कांदा हे नगदी पीक असल्याने छोटा-मोठा शेतकरी शक्यतो हेच पीक घेतो. कांदा हा कधी शेतकऱ्यांना हसवतो तर
नारायणपूर : कांदा हे नगदी पीक असल्याने छोटा-मोठा शेतकरी शक्यतो हेच पीक घेतो. कांदा हा कधी शेतकऱ्यांना हसवतो तर कधी रडवतो. सध्या कांद्याचे बाजारभाव गडगडले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अगदी हवालदिल झाला आहे.
उदाचीवाडी (ता.पुरंदर) येथील शेतकरी काका ज्ञानदेव कुंभारकर व कुंडलिक मेमाणे यांनी यावर्षी त्यांच्या सव्वा एकर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले. अगदी लहान मुलांना जपावे तसे पिकाला जपले. अगदी लागवडीपासून शेत तयार करण्यासाठी, कांद्याची रोपे, कांद्याची लागवड करण्याची मजुरी, विविध तणनाशके, औषधाचा खर्च, विकतचे पाणी चार वेळा घेतले, एका वेळच्या पाण्याला १७०० ते १८०० रु. खर्च होत होता. त्यानंतर खुरपणी, वीजबिल व इतर खर्च मिळून ४७ हजार रुपये खर्च झाला. त्यांनतर कांदाकाढणी मजुरी, कांदा बारदाणा पिशवी जवळपास ८ हजार रु. खर्च, वाहतूक खर्च वेगळाच. शिवाय घरच्या माणसांची मजुरी यात धरली नाही, असे काका ज्ञानदेव कुंभारकर यानी सांगितले.
कोल्हापूर मार्केट येथे कांदा विक्रीसाठी नेण्यात आला. मात्र बाजारभाव मिळाला १०० किलोस ४५० ते ५२० रु.,हाती आले ४७ हजार आणि खर्च झालाय काढणीपूर्वी ४८ हजार रुपये. कांदा बारदाणा पिशवी जवळपास ८ हजार रु. खर्च, गाडीभाडे विकतच्या पाण्याचे ७२०० आणि घरच्या माणसांची मजुरी धरलीच नाही. म्हणजे सरसरी २१ हजार रुपयांच्यावर तोटा झाला आहे. हे एवढे मोठे नुकसान कधीच भरून न निघणारे आहे. पाणी नाही म्हणून शेतात नवीन विहीर खोदली, लाखो रुपये खर्च झाला, मात्र पाणी काही लागलेच नाही. विहिरीला जवळपास ७ लाख रुपये खर्च केला असल्याचे कुंडलिक मेमाणे यांनी सांगितले. कांद्याला सरकारने हमीभाव द्यावा तरच छोटा कांदा उत्पादक शेतकरी जगेल. नाहीतर आता विदर्भ, मराठवाडासारख्या पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होतील. सरकारने कांद्याच्या दरात हमीभाव द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे.