कागदांची खरेदीच केली नसल्याने गुणपत्रिका रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:08 AM2017-08-18T01:08:57+5:302017-08-18T01:08:59+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास थोडासा उशीर झाल्यास लेट फी घेतली जाते, त्याचवेळी निकाल प्रक्रियेत अक्षम्य कुचराई करणा-या दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली जाणार, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला, त्यापाठोपाठ मे २०१७ मध्ये दुसºया सत्राचाही निकाल जाहीर करण्यात आला; मात्र या दोन्ही निकालांच्या गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एमबीएच्या महाविद्यालयांमध्ये शिकणाºया दहा हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेऊन एमबीएला प्रवेश घेतले आहेत. बँकेत गुणपत्रिका जमा न केल्यामुळे त्यांचे पुढील वर्षासाठी मिळणारे लोन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण धोक्यात सापडले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली गोंधळाची परंपरा पुढेही चालूच आहे. विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये परीक्षा शुल्क विद्यापीठाकडून घेतले जाते. त्याबदल्यात सुरळीतपणे परीक्षा घेऊन त्यांच्या निकालाचे योग्य प्रकारे वितरण करण्याची जबाबदारी परीक्षा विभागावर आहे; मात्र परीक्षा विभागाने गुणपत्रिकांची छपाई करण्यासाठी कागदांची खरेदीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखी काही महिने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळू शकणार नाही. कागदांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, त्यानंतर निकालाची छपाई असे सोपस्कार पार पाडावे लागणार आहे. एक वर्षानंतर जर कागद खरेदी करून गुणपत्रिकांची छपाई केली जाणार असेल, तर इतके दिवस परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी काय करीत होते, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
>कुंपणाच्या कामाचा
फेरआढावा घेणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध विभाग, जंगल यांना कुंपण घालण्यासाठी १७ कोटी रुपयांच्या कामाच्या वर्क आॅर्डर काढण्यात आल्या आहेत. यापैकी ६ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले असून, आणखी ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांचा फेरआढावा घेतला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
>एक वर्षापासून विद्यार्थी वंचित
एमबीएच्या विद्यार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत, याची कोणतीही माहिती परीक्षा विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव अरविंद शाळिग्राम यांना देण्यात आली नाही. कुलगुरू गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी होते, परतल्यानंतर याप्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
>संबंधित अधिकाºयांशी चर्चा
एमबीएच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्याबाबत शुक्रवारी परीक्षा विभागाच्या संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली जाणार असल्याचे व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.