एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:55 PM2020-01-21T12:55:39+5:302020-01-21T13:34:51+5:30
केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
लक्ष्मण मोरे
पुणे : केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. जागोजाग आंदोलने आणि निषेध करण्यासोबतच हा कायदा लागू न करण्याची मागणीही केली जात आहे. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हा कायदा मंजूर करुन घेतल्यानंतर विविध राज्यांनी त्याविरोधात भूमिका घेतली आहे. सध्या दिल्लीतील शाहिन बागचे आंदोलनही चर्चेचा विषय ठरलेले आहे. देशभरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने बाहेर पडून आंदोलनात भाग घेतला. पुण्यामध्येही विविध मोर्चे, धरणे आंदोलने झाली. या देशामधून आपल्याला बाहेर जावे लागेल अशी भिती मुस्लिम समाजातील नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याकडे शासकीय कागदपत्रं असावीत. आपल्यासह आपल्या नातलगांच्या जन्म आणि मृत्यूचे दाखले आपल्याकडे असावेत यासाठी मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे ‘जन्म-मृत्यू’ कार्यालय कसबा पेठेत आहे. या कार्यालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून हे दाखले मिळविण्याकरिता मोठी गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांकडून सातत्याने दाखल्यांची मागणी होऊ लागल्याने कामाचा ताण वाढला आहे. अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने दाखले मिळण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांची चिडचिड होत आहे. त्यांच्या रोषाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता या नागरिकांसाठी दिवसभरातील एक विशिष्ठ वेळ ठरवून दिली जाणार असून त्या वेळेत दाखले दिले जाणार आहेत.
पालिकेकडे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमधील जन्म आणि मृत्यूच्या नोंदी येतात. त्यानुसार, पालिका त्याची नोंद अभिलेखावर करते. गेल्या काही वर्षांपासून ही प्रक्रिया संगणकिय प्रणालीद्वारे होत आहे. परंतू, संगणकीय प्रणाली येण्यापुर्वी रजिस्टरवर नोंदी ठेवल्या जात होत्या. दाखले देण्याकरिता रजिस्टरवर नोंद असणे आवश्यक आहे. हे रजिस्टर बाईंड तसेच स्कॅनिंग करुन ठेवलेले आहे. यासोबतच समाविष्ठ अकरा गावांमधील जन्म-मृत्यूच्या नोंदीची पालिकेकडे आहेत. परंतू, काही जणांची रजिस्टरवर नोंद आढळत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
गेल्या महिन्यात अवघ्या काही शेकड्यांमध्ये मागितल्या जाणाऱ्या दाखल्यांचे प्रमाण एकदम हजारोंच्या घरात पोचला आहे. पालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा होणारे अर्ज कसबा पेठ जन्म-मृत्यू कार्यालयामध्ये जमा होतात. या अर्जांची संख्या मागील तीन आठवड्यात वाढल्याने पालिकेचेही ‘टेन्शन’ वाढले आहे.