ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोजणी न करताच अधिकारी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:33+5:302021-04-08T04:11:33+5:30
----- खेड शिवापूर / नसरापूर : रांजे (ता. भोर) या ठिकाणी रिंगरोडच्या मोजणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे ...
-----
खेड शिवापूर / नसरापूर : रांजे (ता. भोर) या ठिकाणी रिंगरोडच्या मोजणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे अधिकारी आले होते. या मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी रक्तदान केले. प्रस्तावित रिंग रोडमध्ये बागायती जमीन शेतकऱ्यांची राहती घरे विहिरी जात आहेत. अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी रिंगरोडच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
यावेळी भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी शेतकऱ्यांना रिंगरोड कशा पद्धतीचा असेल याबाबत माहिती दिली. जमिनीच्या बदल्यात कोणत्याही शेतकऱ्यांना जमीन देता येणार नाही? परंतु शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात पाच पटीने पैसे मिळतील असे सांगितले. मात्र तरीदेखील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध दर्शविला. त्याचप्रमाणे रिंगरोड हा ११० मीटर रुंदीचा असणार आहे. त्या डिजाइनमध्ये सेवा रस्ता नाही. सेकंड फेज मधे सेवा रस्ता करण्यात येणार आहे. अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
शेतकरी म्हणाले की, या रिंगरोडमुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत, त्यांची कुटुंब उघड्यावर येणार आहेत. सेवा रस्ता सेकंड फेजमध्ये करणार मग आत्ताच्या डिझाईनमध्ये सेवा रस्त्याचा समावेश का घेतला नाही?, रेडी रेकनर दराच्या पाच पट मोबदला मिळणार पण रेडी रेकनरचा दर किती? असे अनेक प्रश्न शेतकरी आक्रमक पद्धतीने मांडला. रिंगरोड कसा होणार हे आम्हाला समजावू नका, कारण आम्ही आमची शेतजमीन रिंगरोडसाठी देणार नाही? असे उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यामुळे मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परत जावे लागले.
या वेळी भोरचे प्रांताधिकारी राजेन्द्र जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) कार्यकारी अभियंता संदीप पाटील या वेळी उपस्थित होते.
--
कोट १
पहिल्यापासूनच शेतकऱ्यांना समजून घेण्याची प्रशासनाची भावना आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील आहोत, त्यामुळे पुढील काळात आपण सर्वजण एकत्र येऊन यावर निश्चितच मार्ग काढू.
-राजेंद्र जाधव
(प्रांताधिकारी भोर)
--
कोट २
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लादण्याचा प्रकार प्रशासन करत आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी कुटुंब बागायती जमीन या प्रकल्पात गेल्यामुळे देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध राहणार आहे.
- महेश कोंडे,
स्थानिक शेतकरी
--
फोटो क्रमांक: ०७ खेडशिवापूर रिंगरोड
फोटो- रांजे (ता.भोर) गावात शेतकऱ्यांनी रिंगरोड विरोधात हटके पद्धतीने केलेले आंदोलन