प्रदूषणामुळे नद्यांचा श्वास कोंडतोय

By admin | Published: March 22, 2017 02:58 AM2017-03-22T02:58:35+5:302017-03-22T02:58:35+5:30

भगवान शंकराच्या घामाच्या धारांमधून उगम पावलेल्या भीमा नदीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढीच ती नदी लाखो हेक्टर

Due to pollution, rivers breathe in the air | प्रदूषणामुळे नद्यांचा श्वास कोंडतोय

प्रदूषणामुळे नद्यांचा श्वास कोंडतोय

Next

भीमाशंकर : भगवान शंकराच्या घामाच्या धारांमधून उगम पावलेल्या भीमा नदीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढीच ती नदी लाखो हेक्टर जमीन हरित करणारी जीवनदायिनी आहे. अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली ही नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील गटारांचे पाणी, बेसुमार सुरू असलेला वाळूउपसा, जलपर्णींचा विळखा व औद्योगिक प्रदूषित पाणी यामुळे ही नदी खराब झाली आहे.
सह्याद्री पर्वतामधील भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी ७२५ किलोमीटर वाहत जाऊन गाणगापूर येथे कृष्णाला मिळते. भीमेला प्राचीन काळी भीमरथी किंवा भिवरा म्हणत असत. त्रिपुरासुराबरोबर युद्धामध्ये दमलेले भगवान शंकर सह्याद्रीच्या उंच शिखरावर भीमाशंकरमध्ये जाऊन बसले. त्यांच्या विराट भीमकाय अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचा जो प्रवाह तयार झाला तीच भीमा नदी झाली.
सध्या भीमाशंकर मंदिराकडे जाताना सुरुवातीला डाव्या बाजूला उंच टेकडीवर एक मंदिर व मंदिराच्या बाजुला कुंड आहे. याच ठिकाणी भीमेचा मूळ उगम आहे. येथून लुप्त झालेली नदी सुमारे
५ किलोमीटर पुढे जंगलात गुप्त भीमाशंकर येथून एका उंच कड्यावरून खाली कोसळते. येथून पुढे भीमेच्या प्रवाहाला अनेक लहान-मोठे ओढे, नद्या मिळतात व हळूहळू भीमेचे पात्र मोठे होत जाते.
पुण्यापासून इशान्य दिशेला तुळापूर या ठिकाणी देहू-आळंदीच्या संतभूमीतून आलेली इंद्रायणी भीमेला मिळते. यानंतर भीमेला मुळा, मुठा, घोड नदी अशा अनेक नद्या मिळतात व पुढे भीमेचे पात्र मोठे होत जाते. भू-लोकांचे वैकुंठ म्हणून समजले जाणारे पंढरपूर भीमेकाठीच आहे. या ठिकाणी भीमेचा प्रवाह चंद्रकोरीसारखा आकार घेतो, म्हणून या ठिकाणी भीमेला चंद्रभागा म्हणतात. या भीमेच्या पाण्यावर चासकमान, उजनीसारखी मोठी धरणे झाली आहेत. या पाण्याने लाखो हेक्टर शेती आज ओलिताखाली आली आहे. सोलापूरसारख्या मोठ्या शहराची तहान आज भीमा नदी भागवत आहे. मात्र, आज या भीमेचे स्वरूप पूर्वीसारखे राहिले नाही. भीमाशंकरमधून उगम पावलेल्या या नदीचे रूपडे चासकमान धरणापासून बदलत गेले आहे. मुळा-मुठा नद्यातून पुणे शहरातील येणाऱ्या दूषित पाण्यामुळे निरभ्र स्वच्छ दिसणारे पाणी काळे होत चालले. जलपर्णीने या नदीला पूर्ण विळखा दिला आहे. नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यात मासे टिकत नाही. यामुळे पाणी अस्वच्छ व घाण झाल्यामुळे नदी पूर्ण दूषित झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to pollution, rivers breathe in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.