वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:42 IST2019-04-16T18:40:08+5:302019-04-16T18:42:41+5:30
वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला.

वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला
पौड : पौड (ता.मुळशी) येथील एस.टी.बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला. यु.के.महामुनी असे वाहतुक नियंत्रकाचे तर सुलताना रशिद सिद्दिकी असे वाहकाचे नाव आहे. रामचंद्र दातीर यांना हा सुखद अनुभव आला.
मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे संस्थापक रामचंद्र दातीर हे मालेगावी जाण्यासाठी वनाजहून संभवे एसटीत बसले. गाडीचे चालक हैदर नदाफ, तर वाहक सुलताना सिद्दिकी होत्या. दातीर पौडला उतरले. त्यानंतर संभवे एसटी करमोळीफाटा, रावडेमार्गे संभवेकडे मार्गस्थ झाली. थोड्या वेळाने आपला मोबाईल गाडीतच राहील्याचे दातीर यांच्या लक्षात आले. ते लागलीच पौडच्या एसटी बस डेपोचे वाहतूक नियंत्रक महामुनी यांना भेटून घडलेली घटना सांगितली. दरम्यान दातीर यांच्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी प्रवाशी महिलेने तो मोबाईल पिशवीत लपवून ठेवला होता.
दरम्यान महामुनी यांनी वाहक सिद्दिकी यांना फोन करून एक मोबाईल हरविल्याचे सांगितले. दातीर यांच्या मोबाईलचा नंबरही त्यांनी दिला. त्यावेळी एसटी शिळेश्वरच्या आसपास होती. सिद्दिकी यांनीही चलाखीने गाडी थांबवून हरविलेला मोबाईल कुणाला सापडलाय का याची चौकशी केली. त्यावेळी कुणीही तयार होत नव्हते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मोबाईलवरून दातीर यांच्या मोबाईलशी संपर्क साधला. त्यावेळी गाडीतच त्यांच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्या दिशेने सिद्दिकी गेल्या असता महिलेच्या पिशवीतून मोबाईलचा आवाज आला. त्यावेळी सिद्दिकी यांनी त्या महिलेकडून मोबाईल ताब्यात घेतला. संभव्यावरून गाडी पुन्हा पौडला आल्यानंतर सर्व कायदेशीर सोपास्कार पूर्ण करून दातीर यांना मोबाईल परत दिला. ग्रामीण भागात आजही प्रवास करताना ग्रामस्थांचे एसटीशी कौटूंबिक नाते जडले आहे. त्यामुळे माणूसकीच्या भावनेतून आणि चलाखी दाखविल्याने आपला मोबाईल परत मिळाला, अशा भावना दातीर यांनी व्यक्त करत एसटी महामंडळाचे आभार मानले.