महावितरण कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वानराला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:32+5:302021-09-26T04:12:32+5:30
बेल्हा येथील महावितरणचे कर्मचारी सुरेश गुंजाळ गुळुंचवाडी येथे काम करत असताना याठिकाणी अचानक दोन वानरे आली आणि त्यातील एक ...
बेल्हा येथील महावितरणचे कर्मचारी सुरेश गुंजाळ गुळुंचवाडी येथे काम करत असताना याठिकाणी अचानक दोन वानरे आली आणि त्यातील एक वानर विजेच्या खांबावर चढले. बघता बघता त्या वानराने वीजवाहक तारेला पकडले. त्यावेळी त्याला जोराचा झटका बसल्याने वानर खाली जमिनीवर पडले. गुंजाळ यांच्या लक्षात ही बाबत येताच त्यांनी तत्काळ या वानराकडे धाव घेतली, तसेच काही ग्रामस्थही तेथे आले. वानर बेशुद्ध असल्याचे लक्षात येताच गुंजाळ यांनी प्रथमोपचार करत असताना जवळपास दहा मिनिटे हृदयावर दाब देऊन वानराला उठविण्याचा प्रयत्न केला असता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
येथील दत्तात्रय भांबेरे, विठ्ठल काळे, जिजाभाऊ काळे, संदेश काळे, गंगाराम गुंजाळ, नामदेव आग्रे, गणपत देवकर, नंदू कर्डिले, रभाजी कर्डिले, बापू बांगर, सुखदेव बांगर आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून सह्याद्री डेअरी फार्मच्या वतीने वायरमन सुरेश गुंजाळ आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी कर्मचारी राहुल बोरचटे, निळकंठ पुंडे, अमोल अनमोरवार, राजू कर्डक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आणि आभार मानले.