राडारोड्यामुळे रस्त्यावर साचली तळी

By admin | Published: July 8, 2016 04:18 AM2016-07-08T04:18:21+5:302016-07-08T04:18:21+5:30

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या रस्त्यांवरील पन्हाळींकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे बहुसंख्य रस्त्यांना आता ती व्यवस्थाच राहिलेली नाही. काँक्रीटच्या काही रस्त्यांवर ती व्यवस्था नव्याने केली असली

Due to Radar Road, | राडारोड्यामुळे रस्त्यावर साचली तळी

राडारोड्यामुळे रस्त्यावर साचली तळी

Next

पुणे : पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या रस्त्यांवरील पन्हाळींकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे बहुसंख्य रस्त्यांना आता ती व्यवस्थाच राहिलेली नाही. काँक्रीटच्या काही रस्त्यांवर ती व्यवस्था नव्याने केली असली, तरी पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळेच थोड्याशा पावसाने रस्ते पाण्याखाली जाण्याचा अनुभव पुणेकरांना नुकत्याच झालेल्या पावसात आला.

अशी होती जुनी व्यवस्था
यापूर्वीच्या रस्त्यांना पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रशस्त पन्हाळी असत. त्यांना चौकांमधील ड्रेनेज जोडलेले असे. तसेच रस्त्याला मध्यभागापासून दोन्ही बाजूंना व्यवस्थित उतार दिलेला असे. त्यामुळे कितीही मोठा पाऊस झाला, तरी पाणी रस्त्यात साचून राहात नसे. त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हायचा. फारच मोठा पाऊस झाला तर थोड्या वेळाने का होईना पण सर्व पाणी पावसाळी गटारीतून निघून जात असे.

रस्त्यांच्या कामात मोडल्या पन्हाळी
रस्ते नवे करण्याच्या नगरसेवकांच्या हौसेतून ही व्यवस्थाच अनेक ठिकाणी मोडीत निघाली असल्याचे मागील आठवड्यातील दोन दिवसांच्या पावसात दिसून आले आहे. डांबरी रस्त्यांच्या पूर्वीच्या पन्हाळी यात बुजवल्या गेल्या आहेत. रस्त्यांच्या मध्यभागातून दोन्ही बाजूंना दिला जात असलेला उतार देण्याकडेही ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दोन दिवसांच्या पावसात शहराच्या मध्यभागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी पाण्याची तळी साचल्यामुळे त्यातून वाट काढणे अवघड झाले होते. विशेषत: शहरांच्या पेठांमधील रस्त्यांमध्ये असे प्रकार मोठ्या संख्यने झाले.

पाणी साचल्याने अपघात
रस्ते नवे करताना ते खोदून करणे अपेक्षित असते. मात्र त्याला वेळ लागतो. त्यामुळे ठेकेदार आहे त्या रस्त्यावरच खडी, डांबर ओतून रस्ता तयार करतो. त्यातून बहुतेक रस्ते बरेच वरच्या बाजूला आले आहेत. काही ठिकाणी तर रस्ते आता थेट बाजूच्या दुकानांच्या शटरला लागू लागले आहेत. पन्हाळी बुजण्याचे हेही एक कारण आहे. पन्हाळी नसल्यामुळे पावसाचे पाणी जागा मिळेल त्या दिशेने वाहत जाते. पावसाचा जोर जास्त असला तर पाणी थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत येते. या साचून राहिलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही ठिकाणी वाहनांचे किरकोळ अपघातही झाले.

मोबाईल कंपन्याही जबाबदार
मोबाईल कंपन्यांच्या रस्ते खोदाईतूनही बहुतेक मोठ्या रस्त्यांच्या पन्हाळींची वाट लागली आहे. कंपन्या हे काम ठेकेदारांकडून करून घेतात. ठेकेदारांच्या कामावर ना पालिकेचे नियंत्रण असते ना या कंपन्यांचे. त्यामुळे पन्हाळीच्या बरोबर कडेने कंपन्यांकडून रस्ते खोदले गेले. ते बुजवताना पन्हाळींचा विचार न करता बुजवले गेले. डांबरी रस्त्यांची खोदाई सिमेंटने, तर सिमेंटच्या रस्त्यांची खोदाई डांबराने बुजवण्याचे प्रकारही लॉ कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, गरवारे कॉलेज रस्ता व अन्य बऱ्याच ठिकाणी झाले आहेत. या पद्धतीने पन्हाळी बुजवल्या गेल्याने पाणी वाहून नेण्यासाठी त्या निकामी झाल्या आहेत.

काँक्रीटचे रस्तेही कारणीभूत
सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची रुंदी जास्त असेल तर तिथे गटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काँक्रीटच्या रस्त्यामुळे पावसाचे पाणी मुरत नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे या रस्त्यांवरचे प्रमाण मोठे आहे. त्या तुलनेत गटारीमधील वाहिन्यांचे व्यास मात्र कमी आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असला, की या वाहिन्या निरुपयोगी होतात. त्यातूनही त्यावर प्लॅस्टिकचा कचरा, किंवा झाडांची पाने असे काही आले, की त्यातून पाणी जाणेच बंद होते. हे पाणी मग साचून राहते व रस्त्यावर येते. त्यामुळे या मोठ्या रस्त्यांवरची पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणाही कुचकामीच ठरली आहे.

नालेसफाईचा गाळ रस्त्यावरच
पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून पावसाळी गटारींची स्वच्छता केली जाते. ही स्वच्छता करताना गटारीतून निघालेला गाळ तिथेच कडेला लावून ठेवला जातो. ही स्वच्छतेची कामे पालिका ठेकेदाराकडून करून घेते. निघालेल्या गाळाची विल्हेवाट त्यानेच लावणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ते गाळ काढतात व निघून जातात. गाळ उचलण्याचे काम आमचे नाही, पालिकेचे आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ती जबाबदारी ठेकेदाराची आहे असे सांगितले जाते. या टोलवाटोलवीत गाळ तसाच पडून राहतो व पाऊस झाला की वाहून पुन्हा नालीत अथवा गटारीत जातो. कर्नाटक हायस्कूल, दशभूजा गणपती, वडगाव शेरी अशा अनेक ठिकाणी असा गाळ गटारी किंवा नालीच्या कडेला पडून राहिलेला आहे. नागरिकांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.

क्षेत्रीय कार्यालयांची
जबाबदारी
ठेकेदारांकडून रस्त्यांची कामे करताना पन्हाळींची मोडतोड होते हे खरे असले तरी आता पावसाळी गटारांसाठी थेट पाईपच टाकले जातात. मोठ्या रस्त्यांवर, ते काँक्रीटचे किंवा डांबरी असले तरीही आता पाईपलाईनच असते. त्यातून पावसाचे पाणी वाहून जाते. लहान रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचून राहात असल्याच्या तक्रारी आहेत. क्षेत्रीय कार्यालयांनी तिथे काम करणे अपेक्षित आहे.
- राजेंद्र राऊत, पथ विभाग प्रमुख

गावांमधून येतो कचरा
पालिकेच्या हद्दीत नसलेल्या गावांमधून बराच कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो. तो वाहत येतो व शहरातील नाल्यांमध्ये अडकतो. त्यामुळे पाणी अडून राहते. पावसाळी गटारींमध्येही फार मोठ्या प्रमाणात कचरा असतो. त्यामुळे पाणी प्रवाही राहात नाही. क्षेत्रीय कार्यालयांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुरेश जगताप,
घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख

Web Title: Due to Radar Road,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.