पावसामुळे रस्त्यांवर खड्डे अन् डबकी

By Admin | Published: July 17, 2017 04:31 AM2017-07-17T04:31:44+5:302017-07-17T04:31:44+5:30

शहरामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाण्याची डबकीच डबकी साचली आहेत.

Due to rain caused pits and dump on roads | पावसामुळे रस्त्यांवर खड्डे अन् डबकी

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे अन् डबकी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाण्याची डबकीच डबकी साचली आहेत. तर काही रस्त्यांवर खोदाईनंतर दुरुस्तीची कामे नीट न झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. यामुळे महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. साचलेल्या पाण्याच्या या डबक्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.
कॅम्प परिसरातील मोलेदिना रोडवर नवीन जिल्हा परिषदेच्या चौकात गेल्या तीन-चार वर्षांपासून छोट्याशा पावसानेही मोठे तळे साचते. यामुळे वाहनचालकांना प्रामुख्याने दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. याशिवाय लॉ कॉलेज रोड, प्रचंड वर्दळ असलेला सिंहगड रोड, कर्वे रस्ता, एमजी रोड, कर्नाटक हायस्कूलच्या समोर, अभिनव शाळेलगतचा चौक, राजाराम पुल आदी अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाण्याची लहान-मोठी डबकी साठलेली या पाहणीमध्ये निदर्शनास आली. तर अनेक रस्त्यांवर चेंबरची झाकणे पावसामुळे रस्त्यांपेक्षा खाली जाऊन मोठे खड्डे तयार झाले आहेत. या चेंबरच्या झाकणांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने गंभीर अपघात होऊ शकतो.
अनेक सोसायट्यांच्या समोरच पाणी साठल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर पदपथाशेजारी पाणी साचल्याने वाहनांचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याची दृश्ये शहराच्या विविध रस्त्यांवर दिसत आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर असलेली गटाराची झाकणे बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अशाच ठिकाणी पाणी साचल्याने तुटलेले झाकण व खड्ड्यांचा अंदाज न आल्यास वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालावा लागेल.
शहरातील अनेक भागांत नव्याने केलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे़ स्वारगेट
येथे जेधे चौकात उड्डाण पुल बांधण्यात आला़ हा उड्डाण पुल सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे संपतो, त्या ठिकाणचा रस्ता या वर्षीच करण्यात आला होता़ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत़
कोथरूडमधील अलंकार पोलीस चौकीजवळचा रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागावर पाण्याचे डबके साचले आहेत़ एरंडवणा येथील कर्नाटक हायस्कूलकडून सिटीप्राईडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वप्नशिल्प सोसायटीच्या बाहेर
मोठे पाणी साचले आहे़ यामुळे परिसरात डासांची पैदास होऊ
लागली आहे़

Web Title: Due to rain caused pits and dump on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.