पावसामुळे रस्त्यांची लागली ‘वाट’, लाखो रुपयांचा निधी पाण्यात; नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:37 AM2017-09-25T04:37:37+5:302017-09-25T04:37:44+5:30
इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जोरदार मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील सर्वच रस्ते उखडले आहेत.
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जोरदार मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील सर्वच रस्ते उखडले आहेत. या रस्त्यासाठी वापरण्यात आलेला लाखो रुपयांचा निधी चक्क पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे. गाव वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. आता रस्त्यांच्या कामाची कोण घेणार दखल, नागरिकांना हा प्रश्न पडलेला आहे.
तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपल्याने सर्वसामान्य नागरिकांना, शेतकºयांना व प्रवाशांना फटका बसलेला आहे. गावाला व वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने पूर्वपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा पश्चिमेकडील भागातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. या रस्त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते़ त्यांनतर रस्ते मंजूर करण्यात आलेले होते. लालपुरी, कळंब, लासुर्णे रस्ता एकवर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता पाण्याने वाहून गेला. तर, डाळज, कळस, वालचंदनगर रस्ता पूर्ण होण्याअगोदरच खड्ड्यांना आमंत्रण दिलेले आहे. कळंब- वालचंदनगर रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शिक्रापूर : शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रोडवर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.
शिक्रापूर येथील चाकण चौक ते तळेगाव ढमढेरे गावापर्यंत पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून स्थानिक पुढारी, प्रशासन रस्तादुरुस्तीबाबत हतबल झाल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे या दोन गावांना जोडणारा असल्याने तसेच पुढे न्हावरे, चौफुला व सोलापूर महामार्गाला मिळत असल्याने या रस्त्यावर २४ तास वर्दळ असते. तसेच या रोडवर दोन्ही गावातील महत्त्वाची शासकीय कार्यालये, ग्रामीण रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बँक आदी सुविधा आहेत. त्यामुळे दररोज आसपासच्या ३० ते ४० गावातील नागरिकांची या रोडवर वर्दळ असते. या रस्त्याने वाहनचालकांना कसरत करत वाहन चालवावे लागते. वयोवृद्ध व ज्येष्ठांना या रस्त्याने चालता येत नाही. कित्येकांना या रस्त्याने शारीरिक व्याधी जडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
राजुरी : बेल्हा-जांबुत फाटा रस्त्याच्या कामाला शुभारंभ होणार कधी, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ, तसेच प्रवाशांनी केला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला आहे. पुण्याहून अहमदनगर जिल्ह्याकडे, तसेच नगरहून पुण्याकडे जाण्यासाठी हा मार्ग अंत्यत जवळचा मार्ग असल्याने नेहमीच या रस्त्यावर गर्दी असते. परंतु, या रस्त्याचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून झालेलेच नाही. या रस्त्यावरून उसाची वाहतूक करणारी वाहने तसेच इतर जड वाहने नेहमी येत-जात असतात. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता, अशी अवस्था झाली आहे. येथील रस्त्यावर अनेक लहान-मोठे खड्डे आहेत.
बेल्हा ते जांबुत फाटा हा रस्ता जवळपास सोळा किलोमीटरचा असून, गेल्या सहा वर्षांत फक्त दोन किलोमीटरचे काम झालेले आहे. या रस्त्याच्या कडेले असलेली भोरवाडी, साळवाडी, नगदवाडी, बोरी बुद्रूक, तांबेवाडी गावांमधील ग्रामपंचायतींच्या वतीने वारंंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला, तसेच आमदार, खासदार तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य यांना रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ तसेच प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला एका आठवड्यात सुरुवात न केल्यास, या रस्त्यावर असलेल्या सर्व खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार आहोत. या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागात जे कामकाज चालू असते. ते कामकाज बंद पाडू, असा कडक इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, राजेंद्र भोर व सुदाम घोलप यांनी दिला आहे.