पावसामुळे पालेभाज्या तेजीत
By admin | Published: October 5, 2015 01:53 AM2015-10-05T01:53:08+5:302015-10-05T01:53:08+5:30
जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने पालेभाज्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात होणारी आवक घटल्याने भाववाढ झाली आहे.
पुणे : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने पालेभाज्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात होणारी आवक घटल्याने भाववाढ झाली आहे. नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने कांद्याच्या भावात घट होऊ लागली आहे. तसेच पितृपंधरवड्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या भाज्या तेजीत आहेत.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये रविवारी १८० ते १९० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक काही प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्याच्या बहुतेक भागांत तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी पालेभाज्यांची आवक कमी होत असून, बाजारात आलेला मालही काही प्रमाणात खराब आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या भाज्यांना अधिक मागणी आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीचे भाव स्थिर असले तरी तेजीत आहेत. कोथिंबिरीची आवक सुमारे १ लाख जुडी एवढी झाली. मेथीच्या भावात मात्र वाढ झाली आहे. रविवारी मेथीची केवळ ३५ हजार जुडी आवक झाली. पालकचे भावही आवक कमी झाल्याने वाढले आहेत. इतर भाज्यांचे भाव काही स्थिर पण तेजीत राहिले.
फळभाज्यांमध्ये कांद्याचे भाव उतरू लागले आहे. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने भाववाढ थांबली आहे. रविवारी बाजारात नवीन कांद्याची ५० ट्रक, जुन्या कांद्याची १० ट्रक आणि इजिप्त कांद्याची केवळ २ ट्रक आवक झाली. पितृपंधरवड्यामुळे भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, तांबडा भोपळा या भाज्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भाव तेजीत आहेत. वांगी, पावटा, घेवडा, घोसावळे या भाज्यांचे भावही वाढले आहेत. बाजारात रविवारी परराज्यातून कर्नाटक येथून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा व इंदौर येथून ४० ते ४५ ट्रक बटाटा व मध्य प्रदेशातून सुमारे ३ हजार गोणी लसणाची आवक झाली. स्थानिक भागातून बाजारात सुमारे ५५० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, १८ ते २० टेम्पो फ्लॉवर, १४ ते १५ टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरची, ८ ते १० टेम्पो गाजर, २०० ते २५० गोणी भुईमूग शेंग, ४० ते ५० गोणी मटार, १४ ते १५ टेम्पो तांबडा भोपळा आणि सुमारे ८ हजार गोणी बटाट्याची आवक झाली. नवरात्रोत्सवासाठी बाजारात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. कराड येथून २ ट्रक आवक झाली.