पावसाने मारले, कालव्याने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:20 AM2017-08-09T03:20:34+5:302017-08-09T03:20:34+5:30
पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुरू असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाने दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांना तारले आहे.
या दोन्ही तालुक्यांतील १५ हजार ५५६ हेक्टर शेतीक्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे. सध्या हे आवर्तन सुरू आहे.
संपूर्ण शेतीक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र, नीरा डाव्या कालव्याचे पाणी पोहोचू न शकणाºया भागाचा पाणीप्रश्न अद्याप गंभीरच आहे.
बारामती उपविभागाचे उपअभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाची सुरुवात वितरिका क्रमांक ४६ पासून करण्यात आली.
सध्या ४६ पासून वितरिका क्रमांक २५ पर्यंत आवर्तन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. १० आॅगस्टपर्यंत बारामती उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांचे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.
यामुळे परिसरातील शेतीपिकांना जीवदान मिळणार असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. त्यानंतर निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांमधून आवर्तन सोडले जाणार आहे . ६ सप्टेंबरपर्यंत शेतीसिंचनासाठी आवर्तन सुरू राहणार आहे, असे अकोसकर म्हणाले. पणदरे पाटबंधारे उपविभागाअंतर्गत असणाºया वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, मळद परिसरात नीरा डाव्या कालव्याअंतर्गत एकूण ५७१८ हेक्टर शेतीक्षेत्र आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर शेतीला आवर्तन देण्यात आले आहे.
८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आवर्तन पूर्ण होईल, अशी माहिती पणदरे पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता एस. एस. जगदाळे यांनी दिली.
निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता आर. के. घोटुकडे म्हणाले, की निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत अंथुर्णे क्र. २, निमगाव केतकी १, बावडा शाखेअंतर्गत ५२०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी पाणी अर्ज घेण्याचे काम सुरू आहे.
वितरिका क्रमांक ४९ ते ५९ चे आवर्तन १० आॅगस्टनंतर सुरू होणार आहे. सुरुवातीला शेती आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.
या तलावात सोडण्यात येणाºया पाण्याबाबत धरणक्षेत्रात पडणाºया पावसावर अवलंबून आहे, असे घोटुकडे म्हणाले.
दीड महिन्यापासून पावसाची दडी
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, वीर, भाटघर धरणक्षेत्रावर दमदार पाऊस सुरू आहे. पाणीसाठ्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. पावसाअभावी अडचणीतील शेतीला या आवर्तनाने तारले आहे. बारामती पाटबंधारे उपविभागाअंतर्गत बारामती, सणसर (ता. इंदापूर), अंथुर्णे क्र. १ तीन कार्यालये येतात. या तिन्ही शाखा कार्यालयांतर्गत ४६४८ हेक्टर शेतीक्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या हे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.