वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी केली महावितरण कार्यालयाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 07:55 PM2017-10-04T19:55:25+5:302017-10-04T19:55:42+5:30
वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली.
पुणे - वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली. कोंढवा परिसरातील कार्यालयाची मंगळवारी दुुुपारी बाराच्या सुमारास ही तोडफोडीची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मनसे नगरसेवकासह कार्यकर्त्यांना अटक केली .
नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर (वय-37) यांच्यासह चंद्रशेखर सुभाष लोणकर (वय-42), अमित शिरस (वय-38), सतिश शिरस (वय-37), कुणाल गोंधळे (वय-26), अमित जगताप (वय-37) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक अभियंता लिंगाप्पा बाधे (वय-51, रा. वृंदावननगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात मागील अनेक दिवसांपासून
वीजपुरवठा सुरळीत नव्हता. याप्रकरणी नागरीकांनी तक्रारी करूनही त्यांचे निरसन केले जात नव्हते. त्यामुळे बाबर हे कार्यकर्त्यांसह निवेदन घेऊन महावितरणच्या कार्यालयात आले. त्यानंतर बाधे यांच्या कक्षात येऊन तुम्ही काम करत नाही, तुमच्यामुळे लोकांना त्रास होतो असे बोलून कक्षातील काचा, प्रिन्टर, फोन या वस्तू लाकडी दांडक्याने तोडले. तसेच, कार्यालयात असणा-या वस्तू इतरत्र फेकून देऊन सव्वा दोन लाखांचे नुकसान करून बाधे व महावितरणचे कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलिस निरीक्षक पावसे पुढील तपास करत आहेत.