रोडरोमिओंमुळे तळेघर ग्रामस्थ त्रस्त, निर्भया पथकाची स्थापना करा - पालकांची पोलिसांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:29 AM2017-09-12T02:29:52+5:302017-09-12T02:30:40+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे महाविद्यालयीत तरूणी त्रस्त झाल्या आहेत. या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थीनींनी केली आहे.
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे महाविद्यालयीत तरूणी त्रस्त झाल्या आहेत. या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थीनींनी केली आहे.
आदिवासी मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत प्रश्न कायमचा मिटावा म्हणून गेले पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर या संस्थेच्या वतीने येथे शिवशंकर महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयामध्ये प्रथमत: पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग सुरू होते. यानंतर या विद्यालयाचा विस्तार होवून गेले आठ ते दहा वर्षांपासून विना अनुदानित तत्त्वावर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. आदिवासी भागातील डोंगर दºयाखोºयांमधील मुले-मुली या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. भीमाशंकर आहुपे व पाटण त्याचप्रमाणे खेड तालुक्याच्या हद्दीतील ही मुले-मुली या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्याच प्रमाणे जिल्हापरिषदेची पहिली ते सातवी पर्यंतचीशाळा या गावामध्ये आहे.
परंतु अलीकडे मोठ्या प्रमाणात या गावामध्ये रोडरोमिओंचा उपद्रव वाढला असून आदिवासी भागातील महाविद्यालयीन मुलींना याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेत तात्काळ या रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
गावामध्ये असणारे हनुमान मंदिर या परिसराच्या कट्टयार, जांभोरी फाटा चौकात, जाभोरी रोड, महाविद्यालयीन परिसर, जुने वसतीगृह परिसर या भागांमध्ये बिनधास्तपणे फिरत असतात. काही तरुण दुचाकीवर चौबलसिट, रस्त्यावर वेगाने दुचाकी चालवणे, मोठ्याने ओरडणे, गाणी म्हणणे, शिट्टी वाजवणे, ग्रुपने महाविद्यालयीन गणवेश व्यतिरिक्त टीशर्ट परिधान करून शर्टच्या मागील बाजूस खूनसी काव्यपंक्ती टाकत शेरेबाजी मारणे, महाविद्यालयाच्या खालच्या बाजूस असणाºया पुलावरती बसून मुलींकडे पाहणे, महाविद्यालय परिसर व गावातील हनुमान मंदिर परिसरामध्ये घोळक्याने बसून मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्येच टोळ्या टोळ्या करून मुलींची छेडछाड केली जात असून यातूनच टोळी युद्धांना पेव फुटत आहे.
याबाबत पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलून दामिनी पथक, निर्भया पथकांची स्थापना करावी. त्याचप्रमाणे महाविद्यालय व परिसरामध्ये तक्रार पेट्या बसवण्यात याव्यात. या रोडरोमिओंचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दोन दिवसांपूर्वी या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये महाविद्यालया बाहेरील तरुणांनी येवून सलग धिंगाणा घातला. परंतु महाविद्यालयीन प्रशासनाने याबाबत कुढलीही कारवाई केली नाही. तळेघर हे गाव तालुक्याच्या आदिवासी भागात असून या गावापासून ३५ ते ४० कि . मी. अंतरावरती घोडेगाव पोलीसठाणे आहे. या महाविद्यालयीन युवती तक्रार करणार तरी कोणाकडे? एखादी गंभीर बाब घडल्यानंतर पोलीस जागे होणार का, असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. विशेषत: या ठिकाणी बसस्थानक नसल्याने ठिकठिकाणांवरून बसने येणाºया मुली या हनुमान मंदिरासमोर थांबतात. या ठिकाणी हे रोडरोमिओ फिरत असतात. तसेच त्यांची छेड काढत असतात.